
आदिवासी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी बालविवाह विरोधी जनजागृती- पोलिस अधीक्षक आंचल दलाल
पेण, ता. २८ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या वस्त्यांवर अजूनही बालविवाह होत असून ते कायद्याचे उल्लंघन करणारे आहे त्यामुळे या समाजाला इतर समाजाप्रमाणे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बालविवाह विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पेण येथे बोलताना सांगितले.
पेण पोलीस ठाणे हद्दीतील आदिवासी वाड्यांवर दि.२२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या नऊ दिवसांकरीता “उत्सव नवरात्रीचा जागर नारी शक्तीचा” ही बालविवाह विरोधी जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेत जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी हेटवणे आदिवासीवाडी येथे भेट देऊन उपस्थित आदिवासी बांधवांबरोबर त्यांनी संवाद साधला.
यावेळी त्या अधिक म्हणाल्या की समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्व अधिक नसल्याने पालकवर्ग आपल्या मुलांचे १८ आणि २१ वर्षांखालील असतांनाच लग्न लावून देतात ते कायद्याने चुकीचे आहे. कोणीही असे कृत्य करू नये अन्यथा कायद्याला सामोरे जावे लागेल.त्यामुळे या समाजातील नागरीकांना इतर समाजाप्रमाणे प्रवाहात आणण्यासाठी पेण पोलीसांच्या वतीने बालविवाह विरोधी जनजागृती राबविण्यात येत आहे ती वाखण्याजोगी असल्याचे सांगितले.
या उपक्रमात पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे, महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, पोलीस कर्मचारी, शांतता कमिटी सदस्य, पोलीस पाटील, अंगणवाडी, आशा सेविका तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक यांनी सहभाग नोंदवला आहे. या अभियानाला अनेक आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.




Be First to Comment