
पेण नवरात्रोत्सवाला रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची भेट
पेण, ता. २८ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा कर्दनकाळ म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी नवरात्रोत्सवाला पेण येथील जागृत अंबामाता मंदिराला भेट देऊन सर्वसामान्य नागरिकांबरोबर गरबा खेळल्यामुळे पेणकर थक्क होऊन पोलीस अधिकाऱ्यांचा गरबा पाहण्यासाठी गर्दी केली होती.
रायगड जिल्हामध्ये गेल्या काही महिन्यांपासून नव्याने आलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुर्णपणे कंबर कसली असून जिल्ह्यातील अनेक बेकायदेशीर तसेच अनाधिकृतपणे चाललेल्या धंद्यांवर कारवाई बडगा उगारला आहे.त्यांनी आतापर्यत असंख्य गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगारीचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जात आहे.मात्र पोलीस अधिकारी असतांना आपण सर्वप्रथम एक नागरीक आहोत ही भावना मनामध्ये बाळगून त्यांनी पेण येथे जागृत देवस्थान असलेल्या श्री अंबिका माता मंदिरात भेट दिली असता यावेळी मंदिराच्या ट्रस्ट तर्फे सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ, सहाय्यक उपनिरीक्षक निलेश राजपूत, अंबिका मंदिर ट्रस्टचे बाबुलाल साखळचंद जैन, जयंतीलाल साखळचंद जैन, राहुल बाबुलाल जैन, चिराग दिनेशकुमार जैन, यश मनोज जैन आदि समाजबांधव उपस्थित होते.




Be First to Comment