Press "Enter" to skip to content

ॲमेझॉनच्या गुंतवणुकीतून महाराष्ट्रात डिजिटल क्रांती होणार !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या मुंबईतील डेटा सेंटरचे (ऑनलाईन) भूमिपूजन

मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या मुंबईतील डेटा सेंटरचे (ऑनलाईन) भूमिपूजन पार पडले. या माध्यमातून कंपनीने राज्यातील पहिल्या टप्प्यातील $8.4 बिलियनच्या गुंतवणुकीचा शुभारंभ केला. ही गुंतवणूक, राज्यात कार्यरत असलेल्या $3.7 बिलियनच्या डेटा सेंटर्स व्यतिरिक्त केली जाणार आहे.

महाराष्ट्र हे देशातील गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने सर्वाधिक गुंतवणूक आणली आहे. याच परिषदेत ॲमेझॉनने राज्यात ‘क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर’ क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा सामंजस्य करार केला होता. त्या कराराची अंमलबजावणी आता प्रत्यक्ष सुरू झाली असून, राज्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीत कंपनीचा सहभाग अधोरेखित झाला आहे. पुढील काळातही महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात ॲमेझॉन सक्रिय योगदान देईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘इज ऑफ डूइंग बिजनेस’साठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. परवानग्यांची प्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी ‘इज ऑफ डूइंग बिझनेस वॉर रूम’ कार्यरत आहे. उद्योजकांना ‘रिअल टाइम इन्फॉर्मेशन’ उपलब्ध करून देणारी प्रणाली लागू करण्यात येत आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ॲमेझॉन मोबाईल STEM (science, technology, engineering, and mathematics) लॅब उपक्रमांतर्गत भारतातील पहिल्या ‘थिंक बिग मोबाईल व्हॅन’ला हिरवा झेंडा दाखविला. ही व्हॅन शासकीय शाळांमध्ये फिरून 4000 विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधन व नवनवीन संकल्पना विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे.

यावेळी अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे ग्लोबल पब्लिक पॉलिसी उपाध्यक्ष माइकल पंक, एडब्ल्यूएस इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष संदीप दत्ता आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.