
कुंभार आळीच्या राजाच्या खंडेरायाची भंडारा उधळत थाटात मिरवणूक
पेण, दि. १३ (वार्ताहर) :- गणेशोत्सवानंतर पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या साखरचौथ गणेशोत्सवातील दीड दिवसांच्या गणेशमूर्तींची मिरवणूक पेणमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी पेणचे आकर्षण समजल्या जाणाऱ्या मल्हार रुपातील कुंभार आळीच्या राजाची भंडारा उधळत थाटात मिरवणूक काढण्यात आली. तर पेणमधील इतर बाप्पांच्या मिरवणुका देखील उत्साहात काढण्यात आल्या होत्या.
रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग,उरणार, पनवेल सारख्या ठिकाणी साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यातच पेण शहरात याची जास्त क्रेझ पहायला मिळते. पेण तालुक्यातील हजारो तरुण गणेशमूर्तीकार वर्षभर गणपती मूर्ती बनवण्यात व्यस्त असल्याने गणेशोत्सव काळात त्यांना बाप्पाची मनोभावे हवी तशी पूजाअर्चा करता येत नाही. त्यामुळे पेणमध्ये अनंत चतुर्दशीपेक्षा साखरचौथ गणेशोत्सवाला अधिक महत्व दिले जाते. या साक्षरचौथ गणेशोत्सवातील विसर्जनाच्या मिरवणुका विशेष आकर्षण ठरत असतात. यावर्षी श्री गणेश मित्र मंडळ कुंभार आळीच्या माध्यमातून जेजुरीच्या खंडेरायाची प्रतिकृती साकारून बाप्पाची भंडारा उधळत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी मिरवणूक मार्गावर सर्वत्र भंडाऱ्याची उधळण झालेली दिसत होती. तर गुरव आळी मित्र मंडळाच्या माध्यमातून अघोरी कृत्याच्या खेळाचे सादरीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी अष्टविनायक मित्र मंडळ, ओरिजनल अष्टविनायक मित्र मंडळ,कोंडाळ तलाव, नरदास चाळ यांसह अनेक सार्वजनिक आणि खाजगी बाप्पांचे विसर्जन देखील करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेण पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.




Be First to Comment