
बेलवडे हद्दीतील जलबोगद्यामुळे शेतीसह घरांचे नुकसान मेघा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक
पेण, ता. ८ (वार्ताहर) : पेण तालुक्याच्या हेटवणे धरणातून नवी मुंबईला सिडकोद्वारे जाणा-या पाण्यासाठी बेलवडे आणि जिते या ठिकाणी ३०० फुट जलबोगद्याची निर्मिती केली आहे.मात्र बेलवडे हद्दीतील खोदण्यात आलेल्या जलबोगद्यामुळे येथील अनेक शेतीचे तसेच घरांचे नुकसान झाले असून सदर काम करणाऱ्या मेघा इंजिनीयर कंपनीने येथील शेतकऱ्यांना फसविले असल्याचे सांगण्यात आले आहे.
एकीकडे पेणच्या वाशी खारेपाट विभागातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी व्याकुळ असताना मात्र नवी मुंबईच्या जनतेसाठी सिडकोद्वारे हेटवणे धरणाचे पाणी जलद गतीने तिकडे जाण्यासाठी बेलवडे ते जिते अशा दोन ठिकाणी ३०० फूट जलबोगदा खोदण्यात तसेच ब्लास्टिंग होत असताना यादरम्यान बेलवडे हद्दीतील अनेक शेतकऱ्यांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन अनेक घरांना तडे गेले आहेत.


या जलबोगद्याचे काम मेघा इंजिनियर कंपनीने घेतले असून सुरुवातीला येथील कंपनीने नुकसान होत असलेल्या शेतकऱ्यांना तसेच घरांना नुकसान भरपाई देण्याचे ठरविले होते तसेच रस्त्यातून होणा-या अवजड वाहतूकीमुळे येथील रस्ताची सुद्धा दुरुस्ती करण्यात येईल अशा आश्वासन दिले होते परंतु कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याने शेतकऱ्यांनी आता उठाव केला आहे.त्यामुळे हेटवणे धरणाचे पाणी प्रथम पेणकरांना मिळत नसल्याने हा संघर्ष पेटणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.तर बेलवडे येथे ३०० फूट खोदण्यात आलेल्या जलबोगद्यासाठी ब्लास्टिंग झाली नसून याचा धरणाला कोणताही धोका नाही अशी चुकीची आणि खोटी माहिती देणा-या तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक नरेश पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप रेणुका पाटील यांनी केली आहे.

हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईला जलबोगद्याद्वारे जाण्यासाठी बेलवडे हद्दीत ३०० फूट खोल खोदताना तसेच ब्लास्टिंग करताना येथील शेतीसह अनेक घरांना तडे गेले आहेत त्या दरम्यान मेघा कंपनीने सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची कबूल केले होते परंतु जवळपास एक वर्ष होत आला आहे तरी कोणतीच भरपाई दिली नाही.त्यामुळे याकरीता लवकरच आंदोलन करण्यात येणार आहे.
– प्रवीण पाटील, स्थानिक शेतकरी बेलवडे
बेलवडे गवाच्या हद्दीत पाण्याच्या लाईनसाठी बोगद्याची निर्मिती होत असताना मेघा कंपनीने अनेक शेतींचे नुकसान केले आहे.माती, डबल, खडी शेतात गेल्याने शेती नापीक होऊन ब्लास्टिंग दरम्यान अनेकांच्या घरांना तडे गेले तसेच रस्त्याची सुद्धा दुरावस्था झाली आहे.कंपनीच्या अवजड वाहनांमुळे ग्रामस्थांना रस्त्यातून जाता येता धोका निर्माण झाला असल्याचे याबाबत ग्रामपंचायतच्या वतीने पत्र दिले आहे.परंतु कोणतीच नुकसान भरपाई कंपनीने दिलेली नाही.
– हरेश पाटील, सरपंच – बेलवडे ग्रामपंचायत




Be First to Comment