Press "Enter" to skip to content

अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या हस्ते उद्घाटन

सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळेंच्या वाढदिवसानिमित्त दादर शाळेत वॉटर फिल्टर व कुलरचे उद्घाटन

पेण, दि. 3 (प्रतिनिधी) -:

समाजाला खऱ्या अर्थाने दत्ता कांबळे सारख्या समाजसेवकांची नितांत गरज असून स्वतःच्या वाढदिवसानिमित्त यापुढेही अशीच समाजोपयोगी सेवा त्यांनी कायम सुरू ठेवावी असे गौरवोद्गार राष्ट्रपती पदक विजेते, वडखळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दादर गाव येथे बोलताना काढले. पेणचे समाजसेवक दत्ता कांबळे यांच्या 38 व्या वाढदिवसानिमित्त माध्यमिक विद्यालय दादर येथे रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी वॉटर फिल्टर व कुलरचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी शाळा परिसरात वृक्षारोपणसह पेण पत्रकारांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे इन्श्युरन्सचे वाटप करण्यात आले.

सदर उद्घाटन कार्यक्रमास रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, वक्रतुंड मित्र मंडळाचे संस्थापक दत्ता कांबळे, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, स्कुल कमिटी चेअरमन धनाजी पाटील, मोहन नाईक, साधना कांबळे, राजेश्री कांबळे, माध्यमिक विद्यालय दादर प्राचार्य डी.एस.पाटील, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, विनायक पाटील, स्वप्नील पाटील, राज कडू, मंगेश पाटील, राजू कांबळे, प्रवीण पाटील, ओमकार डाकी आदीं मान्यवर उपस्थित होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वाढदिवस अनेकांचे येत असतात जात असतात मात्र आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने समाजकार्य करणे गरजेचे असते. आपल्या समाजाला दत्ता कांबळे सारख्या खऱ्याखुऱ्या समाजसेवकाची नितांत गरज आहे. कारण दत्ता कांबळे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला समाजउपयोगी कार्य करत असतो असे प्रसाद पांढरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

तर दत्ता कांबळे यांनी बोलताना सांगितले की, सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली संस्थेच्या सर्वच शाळांची शिक्षण पद्धती चांगली असून या संस्थेच्या शाळांमुळे ग्रामीण भागातील खाडी भागासह डोंगर दऱ्यांमधून येणारे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. ते राज्यासह देशाची सेवा करीत आहेत. तुमच्यातील सुद्धा आयपीएस, आयएएस, इंजिनिअर, डॉक्टर, समाजसेवक होऊन या आपल्या समाजाची सेवा करतील अशी अपेक्षा समाजसेवक दत्ता कांबळे यांनी मार्गदर्शन करताना केली.

माध्यमिक विद्यालय दादर शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व ढोल ताश्यांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर वक्रतुंड मित्र मंडळ पेण यांच्या संयोजनाने आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक विद्यालय दादर शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी वॉटर फिल्टर व कुलरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा परिसरात अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या हस्ते झाडे लावत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उपस्थित पेण मधील सर्व पत्रकारांना ओरिएंटल कंपनीचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वक्रतुंड मित्र मंडळाचे पदाधिकारी स्वप्नील पाटील यांनी तर आभार प्राचार्य डी.एस.पाटील व सूत्रसंचालन रोशन पाटील, बी.एस.पाटील यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.