
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आगामी काळाची गरज : उपमुख्यमंत्री अजित पवार
रायगड : याकूब सय्यद
दि.०३ :- राज्य शासन व टाटा समूह उद्योग यांच्यावतीने रोहा येथे कौशल्यवर्धन केंद्र शिक्षणाचे नवे दालन उभारण्यात येत आहे. हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून मे २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. आजच्या घडीला जवळपास सर्वच क्षेत्रात AI चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आगामी काळात आवश्यक ठरणार आहे. या केंद्रातून मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थींनींनी तसेच उद्योग व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.
टाटा, एमआयडीसी व रोहा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खा. सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने रोहा येथील टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे,माजी आमदार अनिकेत तटकरे, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड.राजीव साबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्य चिकित्सक निशिकांत पाटील, सुशिल कुमार जागतिक प्रमुख शासकीय प्रकल्प आणि कौशल्य विकास टाटा टेक्नॉलॉजी लि.पुणे, प्रितम गंजेवार, प्रकल्प समन्वय टाटा टेक्नॉलॉजी लि.पुणे आदि उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना या प्रकल्पाचा फायदा होणार असून, त्याद्वारे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातून दरवर्षी 3 हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेवून कोर्स पूर्ण करणार आहेत. टाटा समूह उद्योग म्हणजे विश्वास असे समीकरणं आहे. त्यामुळे हे काम विहित वेळेत पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रोहा तालुका म्हणजे भातशेतीसाठी प्रसिध्द असलेला तालुका असून या तालुक्यातील सांस्कृतिक, अध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभलेला आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे उद्योग क्षेत्राला प्रशिक्षित कुशल नेतृत्व मिळणार आहे. टाटा समूहाचे या केंद्रासाठी मोठे योगदान असून टप्प्याटप्याने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्याचा शासनाचा मानस आहे. या माध्यमातून राज्यभर तांत्रिक शिक्षण आणि नैसर्गिक कौशल्यातून युवकांसाठी उज्ज्वल रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. स्थानिकांना आपल्या गावातच नोकरी मिळणार आहे असे ही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.
महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी सांगितले की, रोहा एमआयडीसी ही वैशिष्ट्यपूर्ण असून येथील उद्योग स्थलांतरित होण्याचे प्रमाण कमी आहे. टाटा समुहाच्या मदतीने रोहा येथे हा प्रकल्प येत आहे ही आनंदाची गोष्ट असून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याहस्ते या केंद्राचे भूमिपूजन झाल्याने मर्यादित वेळेत दर्जेदार इमारतीचे काम पूर्ण होईल असा विश्वास कु.तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.या प्रकल्पामुळे रोहा व रायगड शहरातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सदर प्रकल्पाचा फायदा होणार असून, त्याद्वारे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच चांगल्या दर्जाच्या नोकरीची संधी वाढवण्यासाठी उच्चसत्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, विद्यार्थ्यांना, उद्योग व्यावसायिकांना नवकल्पना आणि कौशल्य विकास याद्वारे उद्योगात कुशल संसाधने आणि उद्योजकता निर्माण करणे या प्रमुख उद्दिष्टना चालना मिळणार असल्याचेही मंत्री कु तटकरे यांनी सांगितले. रोहा, महाड आणि रसायनी येथे राज्य विमा कामगार हॉस्पिटल प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आले आहेत. याबाबत पाठपुरावा होणे आवश्यक आहे. राज्यातील रोहा अष्टमी एकमेव नगर परिषदेकडे हक्काची ब्लड बँक आहे.या ब्लड बँकेचे अत्याधुनिकरण करण्यात येत असल्याचेही कु. तटकरे यांनी सांगितले.
खासदार सुनील तटकरे म्हणाले की, जिल्ह्यातील रोहा येथील कौशल्यवर्धन केंद्र हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणाचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी घ्यावा. या प्रकल्पामध्ये टाटा समूहाचे मोठे योगदान असून हे काम ते सहा महिन्यांमध्ये पूर्ण करणार आहेत. या प्रशिक्षण केंद्रातून व्यावसायाभिमूख प्रशिक्षण देण्याचे शासनाचे धोरण आहे. याकरिता जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनीही याचा लाभ घ्यावा असे आवाहन खा. तटकरे यांनी केले.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्ह्यातील ज्या गावांचं गावठाण भूमापन होऊन नकाशे व मालमत्ता पत्रक तयार करण्यात आलेलं आहे. सनदा तयार झालेलं आहे, अशा गावांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना स्वामीत्व सनदेचं वाटप करण्यात आलं. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेनुसार अतिक्रमणं नियमित करून सनदेचं वाटप करण्यात आलं.
या कार्याक्रमाला उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, मुख्याधिकारी तथा प्रशासक रोहा नगर परिषद, अजयकुमार एढके, मुख्य अभियंता, म.औ.वि.महामंडळ प्रकाश चव्हाण, रोहा नगर परिषदेतील नगसेवक, नगरसेविका, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
रोहा येथील कौशल्यवर्धन केंद्राबाबत माहिती
टाटा टेक्रॉलॉजी लिमिटेड यांनी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी व औद्योगिक उत्पादनास चालना देण्यासाठी हा प्रकल्प एम आय डी सी सोबत करण्याचा मानस व्यक्त केला होता. या प्रकल्पांमध्ये दरवर्षी अंदाजे ३००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाची एकूण रक्कम इमारत बांधकाम व प्रशिक्षण खर्चासहित रुपये ११५.०० कोटी इतकी आहे. एकूण रक्कमेपैकी रुपये अंदाजे ९८.०० कोटी रक्कम टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे व उर्वरित खर्च रुपये १७.००कोटी (बस्तु व सेवाकर बगळून) महामंडळाकडून संचालक मंडळाच्या मान्यतेने उपलब्ध करण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी आवश्यक जागा रोहा नगरपालिकेमार्फत १८ हजार ५०० फुट (१७०० चौ.मी.) उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कौशल्यवर्धन केंद्र १२५००.००चौरस फूट क्षेत्रफळाची इमारत टाटा मार्फत उभारणी करण्यात येणार आहे. प्रस्तावित कौशल्यवर्धन केंद्र इमारतीचे इमारत नकाशे मंजुरी रोहा महानगरपालिकेमार्फत अंतिम टप्यात असून त्यानुसार लवकरच इमारत बांधकामास सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाची इमारत माहे मे २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी करण्यात येणाःया बांधकामासह तेथे उपलब्ध होणाऱ्या सर्व मशीनरी, औद्योगिक हार्डवेअर, व्यावसायिक तंत्रज्ञान साधने आणि यंत्रसामुग्री, सॉफ्टवेअर व इतर सर्व वस्तूंचे हस्तांतरण महामंडळास होणार आहे व सदरचे प्रशिक्षण केंद्र टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचे मार्फत संचालित करण्यात येणार आहे. केंद्रमार्फत ०९ अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत.




Be First to Comment