
सिद्धार्थ दास ने केली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ची हॅट्रिक
पनवेल / प्रतिनिधी
उलवे रोड येथील रहिवासी असणाऱ्या सिद्धार्थ दास ने चक्क उलट्या दोरीच्या उड्या मारण्यामध्ये तब्बल तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. त्याच्या या असामान्य आणि अतुलनीय कामगिरीसाठी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी त्याचे अभिनंदन केले. रिव्हर्स स्किपिंग या क्रीडा प्रकाराचे ३० सेकंद,१ मिनिट आणि ३ मिनिट असे तीनही विक्रम सिद्धार्थ दास याच्या नावावर आहेत.
दोरीच्या उड्या न अडखळता सलग काही मिनिटे मारणे हे अवघड काम असते.त्यात याच दोरीच्या उड्या उलट्या पद्धतीने मारायच्या म्हटल्या तर आणखीनच दिव्य होऊन बसते. तरी देखील अशा कठीण क्रीडा प्रकारामध्ये सिद्धार्थ ने तब्बल तीन विक्रम नोंदवले आहेत. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सिद्धार्थ ची मुक्त कंठाने प्रशंसा केली तसेच त्याला आगामी वाटचालीत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
अवघ्या सोळा वर्षाच्या सिद्धार्थ दास ने तब्बल तीन विक्रमांना गवसणी घातली असून पाच मिनिटे आणि दहा मिनिटे असे आणखीन दोन विक्रम गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यासाठी तो सज्ज झाला आहे. यापूर्वी ३० सेकंदामध्ये १४८ उड्यांचा विक्रम प्रस्थापित होता. सिद्धार्थने १५१ उड्या मारत हा विक्रम स्वतःच्या नावावर केला. एक मिनिटामध्ये २६१ उड्या मारण्याचा विक्रम यापूर्वी नोंदवलेला होता. हा विक्रम मोडताना सिद्धार्थने २७४ उड्या मारल्या. तीन मिनिट कॅटेगिरीमध्ये यापूर्वी ७०५ उड्यांचा विक्रम नोंदवलेला होता. हा विक्रम मोडताना सिद्धार्थने तब्बल ७११ उड्या मारल्या.
सिद्धार्थने केलेल्या विक्रमाबद्दल माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्याचे वडील संतोष दास म्हणाले की कोरोना लॉकडाऊन पूर्वी सिद्धार्थ हा जलतरणपटू म्हणून सराव करत असे. लॉकडाऊन मध्ये त्याचा सराव बंद झाला, त्यामुळे रोजच्या सरावात खंड पडल्यामुळे त्याला झोप लागत नसे. अशावेळी केवळ सराव सुरू राहावा म्हणून सिद्धार्थने रिव्हर्स स्किपिंग सुरू केले. आज या क्रीडा प्रकारात त्याने तीन विक्रम नोंदविले आहेत. यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्याचे अभिनंदन केले तसेच त्याला आशीर्वाद दिले त्यामुळे मला खात्री आहे की पाच मिनिटे आणि दहा मिनिटे या कॅटेगरीमध्ये देखील तो विक्रम नोंदवेल.





Be First to Comment