

महापारेषण कंत्राटी कामगारांना काढल्यास शिवसेना राज्यव्यापी आंदोलन उभारणार – शिवसेना संपर्क प्रमुख प्रसाद भोईर
पेण, दि. ३१ (प्रतिनिधी) : महापारेषणच्या विभागामध्ये विविध उपकेंद्रांवर व कार्यक्षेत्रांमध्ये अनेक कंत्राटी कामगार मागील पाच ते दहा वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावत असताना या कंत्राटी कामगारांचा कसलाही विचार न करता शासनाने नवीन विद्युत सहाय्यक पदांची भरती प्रक्रियेला प्रारंभ करत या पार्श्वभूमीवर कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता असल्याने असे झाल्यास शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी दिला आहे.
एकीकडे या भरतीमुळे राज्यभरात जवळपास 2600 कंत्राटी कामगारांना कमी केले जाणार असल्याचे समजताच सदर कंत्राटी कामगारांसाठी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची सविस्तर माहिती दिली असता प्रसाद भोईर यांनी तात्काळ महापारेषणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत सदर कंत्राटी कामगारांवर होणारा अन्याय शिवसेना कदापि सहन करणार नाही यासाठी प्रसंगी राज्यव्यापी आंदोलन उभारू असा इशारा देत कामगारांच्या हिताकरीता त्यांनी शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन सांगितले असता दानवे यांनी थेट ऊर्जा विभागाच्या सचिवांशी फोनवर बोलून सदर कामगारांवर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना केली.त्यावर
सचिवांनी देखिल शासन या संदर्भात सहानुभूतीने व सकारात्मक धोरण अवलंबेल असा शब्द दिला.व त्यानंतर महापारेषण चे मुख्य महाव्यवस्थापक एस.एस.गमरे यांनाही यावेळी भेटून कंत्राटी कामगारांना सेवेमधून कमी न करण्याचे सांगितले तेव्हा महाव्यवस्थापक गमरे यांनीही कंत्राटी कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ देणार नाही असे आश्वासन दिले.
त्यामुळे या कंत्राटी कामगारांच्या हिताकरीता शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी तत्परता दाखवून अन्यायग्रस्त विज कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आलेली उपासमारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल राज्यभरातील सर्व महापारेषणच्या कंत्राटी कामगारांनी त्यांचे आभार मानले आहेत.





Be First to Comment