सचिन तांडेल राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने सन्मानित
By City Bell on July 31, 2025
पनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक चे माजी सरपंच सचिन महादेव तांडेल यांना यंदाच्या वर्षीचा राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात पाले बुद्रुक गावाचा कायापालट करून दाखवणारे सचिन तांडेल यांच्या कार्याची पोच पावती त्या पुरस्काराच्या रूपाने मिळाली असल्याची परिसरात चर्चा आहे. सचिन तांडेल यांनी या पुरस्काराचे श्रेय समस्त ग्रामस्थांना दिले आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या जनता केंद्रित कार्यप्रणालीवर निस्सिम विश्वास असणारे सचिन तांडेल हे माजी आमदार विवेक पाटील यांच्या मुशीत तयार झाले आहेत. माजी आमदार बाळाराम पाटील आणि माजी पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटील यांचे मार्गदर्शन त्यांना सातत्याने लाभत असते. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सचिन तांडेल म्हणाले की तांडेल परिवार आणि माझे ग्रामस्थ बांधव तसेच कोळवाडी फणसवाडी येथील माझे सहकारी यांनी मला केलेले सहकार्य व त्यांनी दिलेली संधी यामुळेच मला हा पुरस्कार मिळाला आहे.
पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने नुकताच लोणावळा येथे शानदार समारंभामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनव कल्पनेद्वारे उपक्रम राबवणे, महाराष्ट्रातील गाव खेडी आणि ग्रामस्थांच्या समस्या सोडविणे अशा महत्त्वपूर्ण निकषांच्या आधारावर हा पुरस्कार देण्यात येतो.
पाले बुद्रुक येथून जाणारा पनवेल वावंजे हा राज्य महामार्ग सुकर बनविण्यासाठी माजी सरपंच सचिन तांडेल यांच्या नेतृत्वाखाली केले गेलेले आंदोलन चांगलेच गाजले. सचिन तांडेल यांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षांनी केलेल्या आंदोलनामुळेच हा राज्य मार्ग खड्डेमुक्त झाला.विविध शासकीय योजना समाजातील अखेरच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी माजी सरपंच सचिन तांडेल झटून प्रयत्न करतात. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या नैना प्रकल्पा विरोधात होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. माजी सरपंच सचिन तांडेल यांना यावर्षीचा राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच हा पुरस्कार प्रदान केल्यामुळे योग्य व्यक्तीला योग्य पुरस्कार मिळाला असल्याची भावना जनमानसातून उमटत आहे.
Be First to Comment