Press "Enter" to skip to content

हजारो महिलांच्या उपस्थितीत झेपचा हळदी कुंकू सोहळा

रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ , बांधकाम सभापती आणि झेप फाऊंडेशनच्या संस्थापिका चित्रा आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हळदी कुंकू सोहळ्यामध्ये हजारो सुवासिनींचा सहभाग

अलिबाग / प्रतिनिधी

महिलांना स्वयं रोजगार देऊन महिलांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण करणाऱ्या झेप फाऊंडेशनने अनेक उपक्रमांच्या माध्यमातून सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. त्या उपकक्रमांपैकी हळदी कुंकू हा एक उपक्रम महिलांच्या आठवणीत राहणार ठरला आहे. मकर संक्रांतीचे औचित्य साधून झेप फाऊंडेशनने सौभाग्याचं लेणं असणारा हळदी कुंकू सोहळा आयोजित केला होता. रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ , बांधकाम सभापती आणि झेप फाऊंडेशनच्या संस्थापिका चित्रा आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हळदी कुंकू सोहळ्यामध्ये हजारो सुवासिनींनी आपला सहभाग नोंदविला.

केवळ धार्मिक रूढी जपायची म्हणून हे हळदी-कुंकू नाही तर त्या निमित्ताने आपल्यातील व्यवस्थापनकौशल्य, कलाकुसर दिसते. तसेच वैचारिक , बौद्धिक देवाणघेवाण होते म्हणून हा सण साजरा करते. या निमित्ताने महिला एकमेकींना भेटतात. उखाण्यातून स्त्रियांची कल्पकता, कविवृत्ती जागृत होते व हा आनंद एकमेकींबरोबर वाटला जातो. हळदी-कुंकवाचा वारसा आपण पुढे नेला नाही, तर कोण नेणार? समाजाचं आपण देणं लागतो. मग त्यातील संस्कृतीही आपण जपायलाच हवी आणि हळदी-कुंकू हे त्याचेच निमित्त आहे, असे झेप फाउंडेशनच्या संस्थापिका चित्रा पाटील यांनी सांगितले.

‘चूल आणि मूल’ यातून स्त्रियांनी बाजूला होऊन एकत्र यावे. आपल्या मनातील विचार मांडून प्रत्येक पाऊल प्रगतीचं कसं ठरतंय याचा विचार एकत्र आल्यामुळे होऊ शकतो. या एकत्र येण्याने काही काळ तरी महिला रोजचा ताणतणाव विसरून उत्साहात बाहेर पडतात. नव्या ओळखी होतात. पूर्वजांनी प्रत्येक सणामागे काहीतरी उद्देश ठेवला. यातून भेटीगाठी होतात, प्रेमाची व विचारांची देवाणघेवाण, चालीरीतींना उजाळा मिळतो, असेही चित्रा पाटील यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.