
महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटणं, पतंग उडवणे यासोबतच महिला सुगडी ची पूजा मांडतात. काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीची सुगडींची पूजा या दिवशी करतात. 'सुगड 'हा शब्द सुघट या शब्दाचा हा अपभ्रंश आहे सुघट म्हणजे सुघठीत असा घड. या घड्यात शेतात बहरलेलं नव धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे .लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते. धनधान्याचे प्रतिक म्हणून हरभरा, गाजर ऊस ,तीळ, शेंगदाणे, बोर, तिळगुळ गव्हाच्या लोंब्या हे साहित्य सुगडात भरले जाते व सुगडाला हळद कुंकू वाहून त्याची पूजा केली जाते.
मकर संक्रात अवघ्या काही दिवसांनी आल्यामुळे उरण पनवेल नवी मुंबईच्या बाजारात मागणी असलेल्या काळ्या व तांबड्या रंगाची मातीची सुगडी म्हणजे छोटी मडकी बनवण्यासाठी चिरनेरच्या तेलीपाड्याच्या कुंभार वाड्यात कुंभार बांधवांची लगबग सुरू झाली आहे. नवीन वर्षातील येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रात हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण मकर संक्रांत म्हणजे सूर्यनारायणाचा मकर राशीत प्रवेश.
या दिवशी मित्र-मैत्रिणी नात्यातील, कुटुंबातील आपल्या जिव्हाळ्यातील, मानलेली नाती या सर्वांच्या मनातील क्लिष्टता दूर होण्यासाठी” तिळगुळ घ्या व गोड गोड बोला “असे बोलले जाते. संक्रात म्हणजे प्रेमाने एकमेकांना भेटून स्वभावात गोडवा निर्माण करण्याचे काम या सणात केले जाते. तिळगुळ वाटणे त्याचबरोबर मातीच्या छोट्या मडक्यात सुगडी पूजन करून त्या वाटण्याचा एक महत्त्वाची प्रथा आहे. यावेळी महिला सुगडीची पूजा करून एकमेकींना वाण देत असतात.
चारनेर येथील कुंभार वाड्यात १० ते १५ रुपये दराने एक सुगडीची विक्री केली जाते किरकोळ बाजारात मात्र या सूगडी ची किंमत २० ते ३० रुपयांच्या दरम्यान विक्रीसाठी असते.
आजच्या आधुनिक युगात शहरीकरणामुळे आणि वेगवेगळ्या आकर्षक भांड्यांच्या वापरामुळे मातीच्या पारंपरिक भांड्यांकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे ,पण मकर संक्रातीला मात्र मातीने बनवलेल्या काळ्या, लाल सुगडीला मोठी मागणी आहे.
उरण तालुक्यात चिरनेर, तेलीपाडा, मुळेखंड येथील कुंभार वाड्यात गेल्या महिन्याभरापासून लाल काळी छोटे-मोठी मडके सुगडी बनवण्याची लगबग सुरू झाले आहे.
सुगडी बनवण्यासाठी प्रथम माती आणणे ,तीला चाळणे,मऊ करणे चाकावर छोटी छोटी मडकी बनवणे त्यानंतर ती मडकी उन्हात वाळवणे व भट्टीत चांगल्या प्रकारे भाजणे अशा अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात.आता टेक्नॉलॉजी पुढे गेली असल्याने विजेच्या मोटारीवर सुगडी बनवली जातात. अशी सुबक बनविण्यात आलेल्या सुगडीना मुंबई, नवी मुंबई ,पनवेल, उरण परिसरातील बाजारपेठेत मोठी मागणी आहे.




Be First to Comment