Press "Enter" to skip to content

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष की अर्थपूर्ण डोळेझाक ?

सिडको संपादित जमिनींवर अनधिकृत धंदे फोफावले ; सिडकोच्या जागेवर सुरू आहे अनधिकृत कंटेनर यार्ड

पनवेल उरण महामार्ग लगतच्या सिडकोने संपादित केलेल्या जमिनीवर अनधिकृत धंद्यांचे पेव फुटले आहे. अधिग्रहित जमिनीचा अद्याप सिडकोने वापर केलेला नसल्यामुळे या जमिनींचा सर्रासपणे कंटेनर यार्ड, सर्विस स्टेशन, हॉटेल,गोदामे यासाठी वापर केला जातोय. सरसकट कारवाई होत नसल्याने प्रशासनाचा याच्यावर अंकुश आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे काही ठराविक लोकांवरच कारवाई होत असल्याने प्रशासनाचे कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नुकतेच सिटी बिल वृत्त समूहाने एका प्रकरणाचा खोलात जाऊन अभ्यास केला. यामध्ये मौजे पाडेकर येथे सर्व्हे क्रमांक ४३७/५ या जमिनीवर मूळ मालकाव्यतिरिक्त अन्य व्यक्ती कंटेनर यार्ड चा व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास येते. मूळ जमीन ही जयेश नेहरू नाईक यांच्या कुटुंबीयांची वडिलोपार्जित जमीन आहे. त्यांचे बंधू संजय नाईक काही कालापूर्वी या जमिनीचा वापर करत होते. वास्तविक सिडको ने संपादित जमिनीवर सर्रासपणे सगळेच जण कुठलां न कुठलातरी व्यवसाय करीत आहेत. परंतु राजकीय आकसापोटी गुन्हा मात्र व्यवसाय करत असल्याच्या संशयावरून संजय नेहरू नाईक व अन्य यांच्या वरती दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय नाईक यांनी या जमिनीचा वापर करणे सोडून दिले. त्यानंतर तेथे फिरकले नसल्याचे देखील त्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी गजानन गौंड उर्फ विकी, प्रदीप साहू आणि रुपेश भोईर हे त्या ठिकाणी कंटेनर यार्ड चा धंदा करत आहेत. संजय नाईक यांनी या त्रिकुटाला त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची जाणीव करून दिली. तसेच तुम्ही हा नियमबाह्य धंदा करू नका असे समजावले. यावर सुरुवातीला आज बंद करतो, उद्या बंद करतो अशी चालढकल या त्रिकुटाने केली. त्यानंतर मात्र येऊ दे कोण येतो तो… अशी मग्रुरीची भाषा ते करू लागले. त्यानंतर संजय नाईक यांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात संदर्भीय विषयाचा तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर जवळपास सात महिने उलटून देखील हा धंदा राजरोसपणे सुरू आहे. कारवाईची जबाबदारी असणारे सिडको प्रशासन या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.