
महेंद्र घरत यांच्या हस्ते भव्य कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन
उलवा : `अस्सल मातीतला खेळ म्हणून कबड्डीची ओळख आहे. हा मातीतला खेळ जपण्याचे काम अलिबाग परिसरातील तरुणाई करतेय, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. अलीकडे क्रिकेटचा फिवर तरुणाईत चढल्याचे चित्र समाजात दिसतेय; मात्र त्याला छेद देण्याचे काम अलिबागमधील तरुणाई करतेय, हे पाहून मनस्वी आनंद झाला. येत्या काळात या मातीच्या खेळाला सोन्याचे दिवस आणण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील,` असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केले.
दिवंगत माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अलिबागमधील सातिर्जे येथे आयोजित भव्य कब्बडी स्पर्धांचे उद्घाटन करताना ते बोलत होते. महेंद्र घरत पुढे म्हणाले, `दिवंगत मधुकर ठाकूर यांचे नेतृत्व चांगले होते, सर्वसामान्यांसाठी ते आधारवड होते. हा वारसा ठाकूर परिवार निश्चितच पुढे चालवील. मधुकर ठाकूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कबड्डी स्पर्धांचे आयोजन करून तरुणांना मैदानाकडे वळविण्याची भूमिका स्वागतार्ह आहे.
यावेळी मांडवा सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक भोई यांनीही कबड्डी आणि खेळाडूंविषयी प्रोत्साहनात्मक भावना व्यक्त केल्या. लहान मुले, महिला आणि तरुणाईच्या गर्दीने अलिबागच्या सातिर्जे परिसरात कबड्डीचा मळा फुलल्याचे दृश्य दिसत होते. मंगळवारी (ता. ७) रात्री ८ वाजता दिवंगत माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अलिबागमधील सातिर्जे येथे भव्य कब्बडी स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यात १६ कबड्डी संघांनी सहभाग घेतला आहे.
कबड्डीपटूंची चपळता, तीक्ष्ण नजर, श्वास रोखायला लावणाऱ्या चित्तथरारक लढती पाहून क्रीडारसिकांचा जल्लोष शिगेला पोहचला होता. तरुणाईच्या आनंदाला उधाण आले होते. एकाच वेळी दोन सामन्यांच्या लक्ष्यवेधी लढती रसिकांना मोबाईलपासून काही काळ दूर ठेवण्यास महत्त्वाच्या ठरल्या.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस ॲड. प्रवीण ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर,रायगड जिल्हा उपाध्यक्ष आप्पा थळी, ऍड. उमेश ठाकूर,रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किरीट पाटील, पनवेल शहर जिल्हा ओबीसी अध्यक्ष वैभव पाटील, फिशरमन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मार्तंड नाखवा, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अकलाख शिलोत्री, स्व. मधुशेठ ठाकूर यांचे बंधू काका ठाकूर तसेच ठाकूर परिवारातील सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री स्वयंभू गणेश मित्र मंडळ, जय भवानी क्रीडा मंडळ व सातिर्जे ग्रामस्थांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका निभावली.




Be First to Comment