
बटरफ्लाय स्ट्रोक प्रकारात धरमतर ते कासा खडक हे २४ किमी सागरी अंतर केवळ ५ तास ४० मिनिटांत आर्य ने केले पूर्ण
उलवा, ता. १० : आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी मंगळवारी (ता. १०) शेलघर येथील आपल्या ‘सुखकर्ता’ बंगल्यात आर्य किशोर पाटीलचे अभिनंदन केले आणि त्याला रोख रक्कम म्हणून २१ हजार रुपये देऊन त्याच्या पाठीवर मायेचा हात ठेवला. आर्य हा केवळ १३ वर्षांचा आहे. त्याने बटरफ्लाय स्ट्रोक प्रकारात धरमतर ते कासा खडक हे २४ किमी सागरी अंतर केवळ ५ तास ४० मिनिटांत पूर्ण केल्याचे आर्यचे वडील किशोर पाटील यांनी सांगितले. भारतात बटरफ्लाय प्रकारात एक नंबर, तर जागतिक पातळीवर सर्वात लहान जलतरणपटू म्हणून आर्यने नावलौकिक मिळविला आहे.
आर्यचे अभिनंदन करताना कामगार नेते महेंद्र घरत म्हणाले, ”आर्य हा खूप गुणी मुलगा आहे. त्याने आपल्या वडिलांच्या ५० व्या वाढदिवसादिवशी जलतरणपटू म्हणून भारतात बटरफ्लाय प्रकारात पहिला क्रमांक मिळविला आहे. याचा मलाही अभिमान आहे. आमचा भूमिपुत्र, अवघ्या १३ वर्षांत जगाच्या नकाशावर चमकतोय, याचा मला मनस्वी आनंद आहे. आर्यला जागतिक पातळीवर पुढे जाण्यासाठी शक्य ते सहकार्य केले जाईल.”
यावेळी आर्यने महेंद्र घरत यांचे आभार मानले. आर्यचे वडील किशोर पाटील, आई वैशाली पाटील आणि प्रशिक्षक हितेश भोईर, तसेच काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.




Be First to Comment