Press "Enter" to skip to content

रायगड जिल्ह्यात अलिबाग मधील चोंढी येथे प्रथमच मियावाकी पद्धतीने ११ हजार वृक्षरोपांची लागवड

आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया आणि किहीम ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने चोंढी येथील स्मशानभूमीत ११ हजार विविध रोपांचे मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण

सोगाव – अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील चोंढी येथील स्मशानभूमी येथील मोकळ्या जागेत आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया आणि ग्रुप ग्रामपंचायत किहीम यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता विविध प्रकारच्या ११ हजार रोपांचे मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व आगाखान संस्थेच्या अलिबाग तालुका प्रकल्प व्यवस्थापक अमृता पराडकर यांच्याहस्ते तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले.

आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया हि संस्था मागील काही काळापासून अलिबाग तालुक्यातील ढासळत असलेल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. आगाखान संस्थेच्या माध्यमातून वनीकरण वाढावे तसेच भूजल पातळी वाढावी यासाठी तालुक्यातील स्थानिक ग्रामपंचायत, वनविभाग व इतर सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करत आहेत. यापूर्वी आगाखान संस्थेच्या वतीने आवास, सासवणे, किहीम, थळ, नवगाव, ढवर, बामणगाव, चौल, रेवदंडा या गावातील समुद्रकिनारी व खाडीकिनारील भागात तब्बल २२ हजार झाडे लावली आहेत, तर किहीम, नवगाव, आवास, सासवणे, थळ, नवेदर बेली, नागाव, कुरुळ, या गावांमध्ये तब्बल ८० हजार फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली आहेत. यापुढेही मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, तसेच चोंढी स्मशानभूमी येथील मोकळ्या जागेत किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या संकल्पनेतुन व आगाखान संस्थेच्या माध्यमातून आम्ही मियावाकी पद्धतीने तब्बल ११ हजार रोपांची लागवड करत आहोत, असा मियावाकी पद्धतीने वृक्षांची लागवड करण्याचा आमचा रायगड जिल्ह्यातील पहिलाच प्रयत्न करीत असल्याचे आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया संस्थेच्या अलिबाग तालुका प्रकल्प व्यवस्थापक अमृता पराडकर यांनी वृक्षारोपण कार्यक्रमावेळी बोलताना सांगितले.

यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाला किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या जान्हवी वाघे, निधी काठे, जागृती जरंडे, विणा जाधव, शरद आमले, जितेंद्र जरंडे, विकास जाधव यांच्यासह आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया संस्थेच्या अलिबाग तालुका प्रकल्प व्यवस्थापक अमृता पराडकर, प्रकल्प समन्वयक विशाल सोनावणे, समुदाय संघटक विराज बांदिवडेकर, समृद्धी पाटील, अभिजित वेंगुर्लेकर, स्नेहल पाटील, शितल पाटील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.