Press "Enter" to skip to content

धक्कादायक घटना, बोडणी येथील भानुदास लक्ष्मण कोळी यांनी गळफास घेत केली आत्महत्या

सोगाव – अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे, बोडणी येथील भानुदास लक्ष्मण कोळी( ४८) यांनी सोमवार दि.२३ डिसेंबर रोजी अज्ञात कारणावरून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गळफास घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. याबाबत सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना मांडवा सागरी पोलिसांनी सांगितले की, बोडणी येथील भानुदास लक्ष्मण कोळी (वय ४८) यांनी त्यांच्या बोडणी येथील राहत्या घरी सोमवार दि. २३ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणावरून पंख्याच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते, यावेळी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी जिल्हा रुग्णालयात त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवांनी एकच गर्दी केली होती. रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात येऊन दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी नऊ वाजता बोडणी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील तसेच नातेवाईक, मित्रपरिवार आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, ४ मुली, भाऊ असा मोठा परिवार आहे. कोणत्याही प्रकारचा दुखवटा स्वीकारला जाणार नाही, असे त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास मांडवा सागरी पोलीस करत आहेत.

यावेळी भानुदास कोळी यांचे मित्र, सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी आपल्या मोठ्या भावासारखा असणारा आमचा भानुदासदादा आम्हाला अचानक सोडून गेला, त्याची निर्माण झालेली पोकळी ही कधीही न भरून येणारी आहे, असे सांगत मोठा शोक व्यक्त केला आहे.

मयत भानुदास कोळी हे आपल्या लहान टेंपोद्वारे बोडणी भागात पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचा व्यवसाय करत होते, तसेच अति महत्वाचे म्हणजे ते अलिबाग तालुक्यासह इतर भागातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना मुंबई येथील टाटा रुग्णालयात एक समाजसेवा म्हणून घेऊन जात उपचारासाठी मदत करण्याचे महान कार्य गेल्या काही वर्षांपासून ते करत होते. त्यांच्या या आकस्मिक घटनेबद्दल त्यांच्या अनेक रुग्णांनी मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.