Press "Enter" to skip to content

 “रामबाग” उद्यानाचा रविवारी वर्धापनदिन सोहळा 

७० कलाकारांचा संच असलेला ‘महाराष्ट्राचे आम्ही मराठी’ पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम

पनवेल(प्रतिनिधी) दुबईतील ‘मिरॅकल गार्डन’ च्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावे खाडी येथे असलेल्या ‘रामबाग’ या निसर्गरम्य उद्यानाच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी श्री. सत्यनारायण महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल विधासभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

          माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी ‘स्वर्गसुख आनंद देणारी रामबाग’ साकारली आहे. १४ एकर जागेतील या ‘रामबाग’ उद्यानात भव्य आणि सुरेख प्रवेशद्वार, निसर्गरम्य हिरवळीसह विविध प्रकारच्या फुलझाडांच्या असंख्य विविध रचना, तलाव, विद्युत रोषणाई, पदपथ, चिरेबंदी बांधकाम, आसन व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे, डबल हर्ट आणि स्टोन सेल्फी पॉंईंट, मचवा, पाण्याचे कारंजे, अशा सर्व बाबी आकर्षक आणि मनमोहक आहेत. सायकांळी या उद्यानाचे रूप बदलते, त्यावेळी असणारी विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटणारी आहे. त्यामुळे राज्यातील निसर्गप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देत आहेत. न्हावेखाडी येथे म्हसेश्वर मंदिर येथे अतिसुंदर असलेल्या या रामबाग उद्यानाच्या वर्धापनदिनानिमित्त सायंकाळी ५. ३० वाजता श्री. सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद तर रात्री ०८ वाजता पंचम निर्मित व गणेश भगत प्रस्तुत सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ अर्थात पॅडी कांबळे आणि सोबत ७० कलाकारांचा संच असलेला ‘महाराष्ट्राचे आम्ही मराठी’ हा पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर, श्री. म्हसेश्वर मंदिर कमिटी अध्यक्ष सि. एल. ठाकूर, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील यांनी केले आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.