
ओवळे येथील श्री साई सेवा मंडळाच्या पदयात्रेचे खिडूकपाडा येथे जंगी स्वागत
पनवेल विभागातील ओवळे येथील श्री साई सेवा मंडळाच्या पायी पालखी सोहळ्याला सोमवारी प्रारंभ करण्यात आला. यंदाचे मंडळाचे तेरावे वर्ष आहे. गेली सलग तेरा वर्षे या मंडळाच्या वतीने मार्गशीर्ष महिन्याच्या प्रथम दिनी पायी पालखी यात्रा सुरू करण्यात येते. या पालखीच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था खिडूकपाडा ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ खिडूकपाडा यांच्यावतीने करण्यात आली होती.
श्री साईबाबांच्या पालखीचे गावात आगमन झाले असता महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांनी पालखीला मानाचा खांदा देत स्वागत केले. बँड बाजाच्या तालावर फेर धरत गावातील माता भगिनींनी पालखीचे आगमन साजरे केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश भोईर यांनी देखील पालखीला मानाचा खांदा दिला. त्यानंतर संपूर्ण खिडूकपाडा गावामध्ये पालखी परिक्रमा कारण्यात आली. जागोजागी माता भगिनींनी मनोभावे पालखीचे दर्शन घेतले. सुहासिनींनी औक्षण करून पालखीचे स्वागत केले. या ठिकाणी नवजात बालकांना किंवा तान्या मुलांना पालखी चे खालून नेण्याची प्रथा आहे. त्यानुसार लहानग्यांना पालखी खाली घालून आशीर्वाद प्राप्त करण्यात आले.
पनवेल विभागातील ओवळे येथील श्री साई सेवा मंडळाचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की खिडूकपाडा ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळाने ज्या पद्धतीने आमचे स्वागत केले ते अविस्मरणीय आहे. खरोखरच त्यांच्या शानदार स्वागताने आम्ही सारे जण भारावून गेलो आहोत. ते ज्या पद्धतीने आमच्या मंडळातील पदयात्रींची सेवा करतात ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत. मी श्री साईबाबांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की त्यांनी येथील ग्रामस्थांना सुख संपत्ती आणि आरोग्य प्रदान करावे. निलेश पाटील पुढे म्हणाले की जवळपास साडेतीनशे पदयात्री या पालखी यात्रेमध्ये सहभागी होतात. तसेच त्यांना सहकार्य करण्यासाठी अनेक सेवेकरी देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले असतात. मंडळाचे यंदाचे तेरावे वर्ष आहे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील प्रथमदिनी आम्ही पालखीला आरंभ करतो.
प्रभुदास भोईर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ मंडळ अत्यंत सुनियोजित पद्धतीने या ठिकाणी मिष्टान्न युक्त शाकाहारी भोजनाची व्यवस्था करते. संपूर्ण ग्रामस्थ मोठ्या मनोभावे भोजन सेवा देत असतात. खिडूक पाडा देत असलेल्या सेवेबद्दल श्री साई सेवा मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. दुपारची विश्रांती झाल्यानंतर पालखी पुढील प्रवासाकरता मार्गस्थ झाली. पहिल्या दिवशी पालखीची वस्ती व रात्रीचे भोजन खोणी येथे होणार असल्याचे समजते.
श्री साई सेवा मंडळाचे अध्यक्ष निलेश पाटील, उपाध्यक्ष संजय म्हात्रे, सेक्रेटरी तुकाराम वास्कर, खजिनदार विजय हिरा पाटील, दिंडी प्रमुख नरेश म्हात्रे, धनाजी पाटील या साऱ्यांनी खिडूकपाडा ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळाच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले. प्रभुदास भोईर यांच्या समवेत, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश भोईर,गणेश टेलर,गुरुनाथ ठाकूर, शंकुनाथ भोईर,प्रभाकर उलवेकर,देवदास भोईर,धनंजय भोईर आदी प्रमुख व्यक्तींनी सोहळ्याच्या नियोजनाचे काम काटेकोरपणे पाहिले.





Be First to Comment