उरण : 190 उरण विधानसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात काडीचेही काम झाले नाही त्यामुळे विकासाची वाट पाहणाऱ्या उरणच्या जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे उरण तालुक्याचा हा मागे पडलेला विकासाचा अनुशेष भरून काढून तरूणाना इथेच सन्मानजनक रोजगार मिळवून देण्याचा प्रितमदादा म्हाञे यांचा मानस आहे. त्यासाठी आपण येत्या 20 तारखेला प्रितम दादाना प्रचंड मतानी निवडून देवून तालुक्याला लागलेला कलंक धुवून काढा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यानी दादरपाडा येथे भव्य रॅलीला मार्गदर्शन करताना केले.
उरण विधानसभा मतदार संघाचे शेकापचे उमेदवार प्रितमदादा म्हाञे यानी उरण तालुक्यातील गावाचा दौरा करून तेथील मतदाराच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी वेश्वी दादरपाडा येथे कार्यकर्त्याना ते मार्गदर्शनपर बोलत होते. यावेळी उरण तालुक्यातील शेकापचे प्रमुख नेते महादेव बंडा, फुंडे गावचे सरपंच बिल्लाशेठ, युवानेते रमाकांत म्हाञे, मयुर भोईर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात साळुंखे पुढे म्हणाले हे माझे आणि प्रितमदादाचे मामाचे गाव आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला मताची विनंती नाही तर हक्काने सांगायला आलो आहोत तुम्ही आमचे स्वागत एवढे उत्स्फुर्त केले आहे की तुम्हाला आम्ही सांगण्याची गरज नाही परंतु आपल्याला हा विजय एवढा मोठा करायचा आहे की येथील आगरी, कोळी, आदीवासी बांधधवाचा अपमान करणार्याना कायमची आठवण राहिली पाहिजे.
यावेळी बोलताना प्रितम जे एम म्हाञे म्हणाले की आता पुर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. तरूण शिकला आहे परंतु केवळ नोकरी अभावी तो मागे पडत आहे. या तरूणाना नोकरी मिळावी यासाठी आपण मोफत प्रशिक्षण सुरू केले असून त्यातून 44 तरूणाना एअर पोर्टवर नोकरी मिळवून देण्यात यशस्वी झालो आहे. उद्याच्या भविष्यात अशाच पध्दतीने काम करून हजारो -लाखो तरूणाना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. येथील आमदारानी तालुक्यात काहीच काम केले नसल्याने तो आता केंद्र सरकारचे मोठमोठे प्रकल्पाची कामे आपणच केल्याचे सांगत आहे. आपण न केलेल्या कामाचे श्रेय घ्यायची पण याना लाज वाटत नाही. या भागातील सिडकोचा प्रश्न गंभीर आहे तो सोडविण्याची ताकद फक्त शेकापमध्येच आहे. मध्यस्थी करून दलाली लाटणाऱ्याना आता घरचा रस्ता दाखवून आपण आपल्यातल्या माणसाला संधी देणे काळाची गरज बनली आहे. येत्या 20 तारखेला शिट्टीच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण आपल्या विकासाचा महामार्ग प्रशस्त करायचा आहे आणि मला निवडून द्या असे आवाहन प्रीतम जे एम म्हात्रे यांनी केले.
Be First to Comment