न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील आदेशाबर हुकूम नोंद करण्यास टाळाटाळ ; उरण तहसीलदार कार्यालयातील “स्लो मोशन”कारभार चव्हाट्यावर

उरण / प्रतिनिधी.
जमिनीच्या न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये सन्माननीय दिवाणी न्यायालयाने दावा मंजूर केल्यानंतर देखील उरण तहसीलदार कार्यालयामध्ये त्याची नोंद करण्यात अनाकलनीय टाळाटाळ होत आहे. निकालाच्या आदेशाचे पत्र देऊन एक महिना उलटला तरी देखील अंमलबजावणी होत नसल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या वयोवृद्ध व व्याधीग्रस्त वादिंनी तहसील कार्यालयाच्या "स्लो मोशन" कार्यपद्धतीवर खेद व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील सुरंगपाडा येथे राहणारे दशरथ धावजी मते यांनी दिवाणी न्यायाधीश यांच्या न्यायालयात नियमित दिवाणी दावा क्रमांक १२५/२०२३ हा दाखल केलेला होता. त्यानुसार मौजे पौंडखार व मौजे धुतुम येथील मिळकतींमध्ये दाखल उपरोक्त दावा उरण न्यायालयाने २३ सप्टेंबर २०२३ रोजी मंजूर केलेला आहे. या निकाल पत्रानुसार वादी क्रमांक एक ते २३ आणि प्रतिवादी क्रमांक १ ते ४ यांच्यात वाटप करण्यात आलेले आहे. न्यायालयाच्या निकालाच्या आदेशाचे नोंद करण्याचे पत्र ७ ऑक्टोबर रोजी दाखल करून महिन्याभराचा कालावधी लोटला तरी देखील संबंधित आदेश पारित झालेले नाहीत.
उपरोक्त प्रकरणातील ७ वादी या वयोवृद्ध महिला असून त्या मधुमेह, अस्थिव्यंग, गुडघेदुखी अशा आजाराने त्रस्त आहेत. अशा अवघड परिस्थितीत देखील त्यांना संबंधित नोंद झाली की नाही हे तपासण्या करता उरण तहसीलदार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. वयोवृद्ध महिला वादींना त्रास होत असतानाच सन्माननीय दिवाणी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात अक्षम्य देरी होत असल्याने तो एक प्रकारे न्यायालयाचा अवमान देखील आहे.
वयोवृद्ध व व्याधीग्रस्त महिला वादी यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. हल्ली सरकारी कार्यालयात आपल्या न्याय हक्काची कामे करताना देखील चिरीमिरी द्यायचा रिवाज सर्वश्रुत आहे.त्यामुळे या प्रकरणातील व्यक्ती हक्काचे काम करून घेण्यासाठी टेबलाखालील मलिदा सोडत नसल्याने त्यांचे काम आडले आहे की काय? अशी चर्चा दबक्या आवाजात उरण परिसरात सुरू आहे.
वादी क्र २ देऊबाई पांडुरंग घरत वय ७१ वर्ष
वादी क्र ३ आनंदी फुलाजी घरत वय ६९ वर्ष
वादी क्र ४ पार्वती रघुनाथ घरत वय ६८ वर्ष
वादी क्र ५ ठकाबाई मोरेश्वर ठाकूर वय ६६ वर्ष
वादी क्र ७ राधाबाई अमृत मते वय ७३ वर्ष
वादी क्र ११ पार्वती अरुण मते वय ६४ वर्ष
वादी क्रमांक १७ विमल कृष्णा घरत वय ६२ वर्ष




Be First to Comment