वाहतूकदार असोसिएशनच्या बेदरकार ट्रक चालकांची दिवसेंदिवस वाढती मग्रुरी ; स्टील मार्केट कमिटीने आत्ताच लक्ष न घातल्यास भविष्यात मोठा संघर्ष होण्याची चिन्हे
अपघातचा बळी ठरलेला कर्मचारी आणि अनाथ झालेले कुटुंब
कळंबोली/ ( स्पेशल रिपोर्ट)
आशियातील सर्वात मोठे समजल्या जाणाऱ्या कळंबोली लोखंड व पोलाद बाजार आवारात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.बेदरकार ट्रक ड्राइव्हरने एका ३२ वर्षीय कर संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.या अपघातामुळे वाहतूकदार असोसिएशनचे वाहन धारक, लोखंड व पोलाद बाजार समिती आणि वाहनकर संकलन करणारी संस्था यांच्यातील तिढा चव्हाट्यावर आला आहे. या समस्येवर प्रभावी तोडगा न काढल्यास आगामी काळात मोठा संघर्ष होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीच्या माध्यमातून आवारामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांकडून प्रत्येक आठ तासांकरता कर जमा केला जातो.या कामासाठी नियम व निकषांच्या अंतर्गत निविदा काढली जाते. तूर्तास ए एस मल्टी सर्विसेस यांच्याकडे अवजड वाहन प्रवेश कर जमा करण्याचे काम सुपूर्द करण्यात आले आहे. या कामी सदर कंत्राटदाराने ३ कोटी रुपये अनामत रक्कम भरलेली असून हा ठेका त्यांच्याकडे तीन वर्षांकरिता आहे. प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनाकडून १०० रुपये अधिक वस्तू व सेवा कर असा आकार घेतला जातो.
वाहतूकदार असोसिएशन यांच्या माध्यमातून स्थानिक असल्याचे भासवत जवळपास एक हजार ट्रक चालकांना पास काढण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा वाहनांवर एक विशिष्ट प्रकारचा स्टिकर लावलेला असतो. निविदा प्रक्रियेमध्ये अशा प्रकारची सवलत देण्याबाबत बाजार समितीने कुठल्याही प्रकारचे दस्तावेज अथवा नोंद केलेली नाही. तरी देखील कर संकलन करणारी संस्था सवलत पास असणाऱ्या वाहनांकडून कर आकारत नाही. परंतु असोसिएशनचे सदस्य असणारे ट्रक ड्रायव्हर मात्र कर संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी मग्रुरीने वागत असल्याचे ए एस मल्टी सर्विसेस या संस्थेचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाड्या घालण्याचे प्रकार नित्याने होत असतात. यामध्ये अपघातात मृत्यू झाल्याचे हे दुसरे प्रकरण समोर आले आहे. मागील आठवड्यात एका कर्मचाऱ्याच्या पायावर गाडी टाकून त्याला जायबंदी करण्यात आले.
मयत संदीप मिश्रा वय वर्ष ३२ हा केवळ त्याचे कर्तव्य बजावत असता बेदरकारपणे गाडी चालवत वाहन क्रमांक एम एच ०४ जीसी ७७०६ वरील चालक बिलाल अहमद हजरत अली याने संदीप यास चिरडले. या अपघातात संदीप मिश्रा याचा घटना स्थळीच जागच्या जागी मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर चालक पळून गेल्याचे खात्रीलायक सूत्रांचे वतीने सांगण्यात आले.संदीप मिश्रा यांच्या पश्चात तीन लहान मुले असून त्यांच्या कुटुंबाचा एकुलता एक उदरनिर्वाहाचा आधार हरपला आहे. या घटनेची कळंबोली पोलीस स्थानकामध्ये नोंद झालेली असून पुढील तपास पोलिसांच्या वतीने सुरू आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या ट्रान्सपोर्ट सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर यांनी झाल्या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की वाहनांवरील प्रवेश कर गोळा करण्याचे काम हे नियम व निकषांचे अंतर्गत आणि पूर्णतः अधिकृत पूर्वपरवानगीने होत आहे. वाहतूकदार असोसिएशनच्या सदस्यांना करामध्ये अंशतः सवलत देखील प्राप्त झालेली आहे. तरीदेखील अशा संघर्षाच्या घटना वारंवार होत असल्यास मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीने यामध्ये लक्ष घातले पाहिजे. त्यांच्या पुढाकाराने कर गोळा करणारी संस्था आणि वाहतूकदार असोसिएशन यांच्या दरम्यान साधक-बाधक बैठक होणे ही काळाची गरज बनली आहे. असे न झाल्यास हा संघर्ष वाढीला लागेल व या ठिकाणी असलेले सलोख्याचे वातावरण गढूळ होऊन जाईल. तसेच अपघाताच्या या प्रकरणामध्ये दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची विनंती मी पोलीस बांधवांना करत आहे.
सदर अपघात प्रकरणात ट्रक चालक बिलाल अहमद हजरत अली याला जामीन मिळाला आहे. मयत संदीप मिश्रा याच्या उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला वाली कोण? त्यांना न्याय कोण मिळवून देणार? या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात शोधणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
कर जमा करणारे कर्मचारी आणि वाहनचालक यांच्यातील संघर्ष अत्यंत गांभीर्याने घ्यावा लागेल. झाल्या प्रकरणांमध्ये अपघात घडला ? की कोणी घडवून आणला ?याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
Be First to Comment