रायगड जिल्ह्याच्या शिरोपेचात मानाचा तुरा
पनवेल / प्रतिनिधी.
पनवेलच्या चांगु काना ठाकूर विद्यालयात सहावी इयत्तेत शिकणाऱ्या सायुज्य महामुनी याच्या कलाकृतीचे मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन भरणार आहे.यामध्ये राज्यभरातील १६ निवडक चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरणार आहे. अशाप्रकारे मुंबईच्या नामांकित आर्ट गॅलरीमधील प्रदर्शनात सहभागी होणारा सायूज्य हा रायगड जिल्ह्यातील पहिलाच चित्रकार असल्याने रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.१२ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान वरळी येथे हे कला प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.
सायुज्य सध्या कला शिक्षक नवीन मोरे यांच्या कडून चित्रकलेचे अध्ययन करत आहे. ऑइल पेस्टल आणि पेन्सिल स्केच या दोन माध्यमांच्यात सध्या त्याचे शिक्षण सुरू आहे. इतक्या लहान वयात त्याच्या अप्रतिम कलाकृती अचंबित करायला लावतात. व्यक्तिचित्रणासारखा कठीण विषय देखील तो लिलया कागदावर हुबेहूब उतरवतो. त्याच्यातील चित्र कौशल्याची दखल वरळीच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरी सारख्या नामांकित संस्थेने घेतल्यामुळे त्याच्यावर तूर्तास अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त या केंद्रामध्ये दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. यंदाचे वर्षी “बाल दिशा” या उपक्रमांतर्गत नेहरू सेंटर मध्ये लहान मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १२ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ११ ते ७ या वेळेत या प्रदर्शनातील चित्रे पाहण्यास मिळतील.सायुज्य चे वडील गणेश महामुनी हे शिपिंग इंडस्ट्री मधील आय टी सेक्टर मध्ये काम करतात तर आई ऋतूजा या शिक्षिका आहेत.सायुज्य ची चित्रे नेहरू आर्ट सेंटर सारख्या मोठ्या केंद्रातील आर्ट गॅलरीमध्ये पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली तसेच या चित्र प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी सगळ्यांना केले आहे.
Be First to Comment