Press "Enter" to skip to content

बालदी यांनी केला आगरी समाजाचा घोर अपमान

महेश बालदी यांनी आगरी समाजाची माफी मागावी, अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेची मागणी

उरण दि ७(विठ्ठल ममताबादे )
अनेक विधानांतून महेश बालदी यांनी आगरी समाजाचा घोर अपमान केला आहे. याबद्दल बालदी यांनी समाजाची जाहीर माफी मागावी. समाजाबद्दलचे असे अनुद्गार यापुढे आम्ही कदापि खपवून घेणार नसल्याचा इशारा अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने पत्राद्वारे महेश बालदी याना दिला आहे. यापूर्वी अखिल आगरी समाज परिषद यांनी देखील महेश बालदी यांनी आगरी समाजाची माफी मागावी अशी मागणी केली होती.

अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, काही लोकांच्या आशिर्वादाने सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर आतापर्यंत आगरी समाजाबद्दल जी विधाने केलीत, त्यांतून आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ज्या आगरी समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतले, त्यानांच कमी लेखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न तुम्ही वारंवार केला आहात. “ही काही आगरी समाजाच्या संघटनेची निवडणूक नाही.” या विधानातून तुमचा समाजाला एकप्रकारे कस्पटासमान लेखण्याचा इरादा दिसून आला आहे. अशा प्रकारे सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा महेश बालदी यांच्याकडून तोडल्या गेल्या आहेत. याचा समस्त आगरी समाज जाहीर निषेध करीत आहे. बालदी यांच्याकडून ही गोष्ट पहिल्यांदाच अनवधानाने घडलेली आहे, असेही म्हणता येणार नाही. बालदी हे आगरी समाजाला तुच्छतेच्या भावनेने पहात असल्याचेच त्यांच्या देहबोलीतून आतापर्यंत दिसून आले आहे.

यापूर्वी महेश बालदी यांनी माझी जात बघायला, तुम्ही मला मत देणार आहात की मुलगी” अशी वायफळ बडबड करुन येथील माता-भगिनींचा अपमान केला आहे. आमच्या आयाबहिणी काही रस्त्यावर पडलेल्या नाहीत. हे आपण ध्यानात घ्यावे. असा सूचक इशारा अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने दिला आहे. एकीकडे स्थानिक भूमिपुत्र नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करीत आहे. त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने देखील केली, आणि दुसरीकडे मात्र या विमानतळाचा उल्लेख जाणीवपूर्वक “आदाणी विमानतळ” असा करुन बालदी यांनी स्थानिकांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. अशा प्रकारे अनेक विधानांतून महेश बालदी यांनी आगरी समाजाचा घोर अपमान केला आहे. याबद्दल बालदी यांनी समाजाची जाहीर माफी मागावी. समाजाबद्दलचे असे अनुद्गार यापुढे आम्ही कदापि खपवून घेणार नसल्याचे अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने मागणी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.