विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देणार!–मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
नवी मुंबई/ विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज भारतीय वायुदलाच्या वतीने ‘सी-२९५’ चे यशस्वीरित्या लँडिंग करण्यात आले तर ‘सुखोई-३०’ या विमानाचा यशस्वी फ्लाय पास करत धावपट्टीची चाचणी घेण्यात आली. भारतीय वायूदलाचे ‘सी-२९५’ विमानाने नवी मुंबई विमानतळावर यशस्वी लँडिंग करत धावपट्टीवर उतरताच या विमानाला ‘वॉटर सॅल्यूट’ देण्यात आला. त्यापाठोपाठ ‘सुखोई-३०’ विमानाचा देखील यशस्वीपणे फ्लाय पास करण्यात आला. यानंतर या धावपट्टीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाऊन पाहणी केली.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वायुदलाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचेही अभिनंदन करत स्वतः कॉकपिट मध्ये बसून उपस्थितांना अभिवादन केले. या विमानांच्या यशस्वी चाचणीनंतर आता लवकरच या विमानतळावरून आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे करता येणे शक्य होणार आहे.

ही चाचणी यशस्वी करून दाखवल्याबद्दल भारतीय वायुदलाचे सर्व अधिकारी, वैमानिक, इतर कर्मचारी तसेच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचे मुख्यमंत्र्यांनी विशेष आभार मानले. तसेच लवकरात लवकर हे विमानतळ कार्यान्वित होऊन येथून प्रवासी वाहतूक सुरू व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. या विमानतळाला भूमीपुत्रांचे नेते कै. दी. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यांचेच नाव या विमानतळाला देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
या धावपट्टीची चाचणी यशस्वी झाल्याचे वायुदलाने जाहीर केले असले तरीही या विमानतळावरून मार्च २०२५ पर्यंत आंतरदेशीय विमाने उड्डाण करू शकणार असून आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणाकरिता मात्र जून २०२५ पर्यंत वाट पहावी लागणार आहे. या विमानतळावर २ रनवे तयार करण्यात येणार असून ४ टर्मिनलवर एकाच वेळी ३५० विमाने पार्क करता येणे शक्य होणार आहे. या विमानतळाला मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी देखील असणार आहे. विमानतळावर ४ टर्मिनल बिल्डिंग असल्या तरीही कोणत्याही टर्मिनलवर गेले तरीही प्रवाशांना त्यांच्या फ्लाईटपर्यंत पोहोचता येणार आहे.

या चाचणीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, खासदार नरेश म्हस्के, आमदार गणेश नाईक, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर,सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे, उपायुक्त राहुल गेठे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment