पनवेल /प्रतिनिधी
सिडको अंतर्गत नैना परिक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या भूखंडांचे तातडीने सिमांकन व हस्तांतरण करून त्यांना नियमानुसार योग्य प्रकारे भूखंडाचे वाटप करावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, नैना प्रशासनाने सध्या मोठ्या प्रमाणावर नैना परिक्षेत्रात विकासकामांचे प्रयोजन केले असून त्या सर्व विकासकामांना सुरूवात तातडीने करावयाचे ठरले असल्याबाबत माहिती मिळत आहे. विकासकामे होणे हे अतिशय योग्यच आहे, परंतू तत्पूर्वी ज्या क्षेत्रात ही विकासकामे नैना प्राधिकरणाने प्रस्तावित केली आहेत, त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. या क्षेत्रांतील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी नैना प्राधिकरणाने घेतल्या आहेत, त्यांना नियमानुसार त्यांच्या वाट्यांस येणाऱ्या भूखंडांचे योग्य पध्दतीने वाटप होणे गरजेचे आहे. येथील अनेक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या भूखंडाचे अद्याप सिमांकन (Demarcation), हस्तांतरण (Transfer) झालेले नाही. त्याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार सांगूनसुध्दा प्रशासन सदर गोष्टी गांभीयनि घेत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या जागेबाबत अनेकजणांच्या हरकती व नाराजी आहे, त्यांची योग्य प्रकारे दखल न घेताच नैना प्राधिकरणाने विकासकामे प्रस्तावित केली आहेत. विकासकामे ही गरजेचीच आहेत, परंतु ती स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच झाली पाहिजेत, मात्र तसे न झाल्याने त्याबाबत स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष आहे व या असंतोषाचा कधीही उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बाबींचा तातडीने विचार करून, सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या जमिनी, भूखंडाबाबत समस्यांचा त्वरित निपटारा करून नंतरच या विकास कामांची सुरुवात करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचा असंतोष कमी होईल व योग्य प्रकारे कामे मागीं लागतील, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले असून अन्यथा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने सिडको नैना प्रशासनाविरोधात कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला दिला आहे
Be First to Comment