वि खं विद्यालयात शिक्षक संवाद मेळावा संपन्न
पनवेल तालुका पुरोगामी शिक्षक आघाडीने केले होते आयोजन
तुम्हा साऱ्यांची साथ लाभली तर पनवेल चे नष्टचक्र दूर करायला वेळ लागणार नाही
-माजी आमदार बाळाराम पाटील यांचे शिक्षक बांधवांना आवाहन
पनवेल/ प्रतिनिधी.
आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.पनवेल विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार बाळाराम पाटील यांनी विविध सामाजिक घटकांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे.याच पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील शिक्षक बंधवांशी संवाद साधण्याचे हेतूने पनवेल तालुका पुरोगामी शिक्षक आघाडीच्या वतीने पनवेलच्या वि. खं.विद्यालयात रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेकडोच्या संख्येने उपस्थित रहात शिक्षक बांधवांनी या संवाद मेळाव्याला उदंड प्रतिसाद दिला.
१९ व्या लोकसभेच्या निकालांवरून महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भारतीय जनता पार्टीच्या जातीय व धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला जनता जुमानत नसल्याचे या निवडणुकांनी स्पष्ट केले.केंद्रात भाजपा चे सरकार नसून ते एन डी ए चे सरकार असल्याची सत्यता भाजपा ला मोदी यांच्या तिसऱ्या टर्म मध्ये जाणवली.पनवेल विधानसभा मतदार क्षेत्रात देखील नागरिक अनेक समस्यांनी हैराण झाले आहेत.
पनवेलच्या कोकण एज्युकेशन सोसायटीचे विठोबा खंडप्पा हायस्कूल येथे संपन्न झालेल्या शिक्षक मेळाव्यात शिक्षकांच्या विविध संघटनांनी माजी आमदार बाळाराम पाटील यांना विधान परिषदेतील उत्कृष्ट भाषणासाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यात रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघटना, रयत शिक्षण संस्था रायगड विभाग, पडघे विभागीय शिक्षण संस्था, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी संचलित क्रीडा प्रबोधिनी, पनवेल निवासी मुंबई शिक्षक या संघटनांनी माजी आमदार बाळाराम पाटील यांचे अभिनंदन केले.
रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे माजी पदाधीकारी व्हि ए पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. यावेळी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी बाळाराम पाटील यांचा गौरव केल्याने तसेच नुकतेच लोकमत वृत्त समूहाच्या वतीने बाळाराम पाटील यांना आदर्श लोकसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यामुळे आजचा कार्यक्रम हा दुग्ध शर्करा योग असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यात जोपर्यंत शिक्षक बांधवांना जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत बाळाराम पाटील यांनी स्वतःचे पेन्शन न घेण्याची जी भीष्मप्रतिज्ञा केली आहे त्याचे प्रत्येकाने आवर्जून कौतुक केले. सर्वच वक्त्यांनी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सहा वर्षाच्या कालखंडात कोकण शिक्षक मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना केलेल्या धडाकेबाज कामांबद्दल उपस्थित शिक्षक बांधवांना अवगत केले.
सुरेंद्र पाटील,मुख्याध्यापक पडघे विभाग शिक्षण संस्था.किशोर पाटील, रयत सेवक बँक संचालक व वाशी शाखेचे चेअरमन, रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बी एस माळी,वसंत मोकल, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना,जितेंद्र ठाकरे,स्नेहल ठाकूर,गजानन पिले, मांढरे सर, राजेश केणी,काशिनाथ पाटील या साऱ्यांनी मनोगतातून माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या आम्ही पाठीशी ठामपणे उभे राहणार असून ते सांगतील ते जबाबदारी पार पाडू अशी भूमिका मांडली.
मेळाव्याला उपस्थित शेकडो शिक्षक बांधवांना संबोधित करताना माजी आमदार बाळाराम पाटील म्हणाले की शिक्षक आमदार म्हणून काम करत असताना तुम्हा सगळ्यांची मला मोलाची साथ लाभली आहे. पनवेल पंचायत समितीचा सभापती त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य विभागाचा सभापती आणि रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या पदांवरती काम केल्याचा अनुभव असल्यामुळे कोकण शिक्षक मतदार संघाचे मी यशस्वीपणे राज्याच्या विधान परिषदेत प्रतिनिधित्व करू शकलो. जिल्हा परिषदेतील निधी विनीयोगाच्या अनुभवामुळेच माझ्या आमदार निधीचा 100% परिपूर्णरित्या वापर करून शाळांना संगणक,प्रिंटर्स, ई लर्निंग साहित्य, शैक्षणिक साहित्य देऊ शकलो याचे समाधान आहे. किंबहुना यापूर्वी शिक्षकांच्या परिषदांनी शिक्षक आमदारांचा निधी हा अन्यत्र वापरला होता त्यामुळे कित्येक शाळांना आमदार निधी पहिल्यांदाच पोहोचला. शेतकरी कामगार पक्षाच्या ध्येयधोरणानुसार आंदोलन हेच आमचे काम करून घेण्याचे शस्त्र आहे. आणि हे शस्त्र वापरण्याचा मला अनुभव असल्याने शिक्षकांची कामे मार्गी लावण्यासाठी त्याचा मला लाभ झाला. मला समाधान आहे की मी ६० हजार शिक्षकांना अनुदान सुरू करून देऊ शकलो.
बाळाराम पाटील पुढे म्हणाले की जवळच्या माणसांशी हितगुज करून चांगल्या कामाची सुरुवात करावी असे सांगतात. म्हणूनच आज तुमच्याशी हितगुज करून पुढील लढाईला सुरुवात करत आहे. पनवेल तालुक्यामध्ये के.जी.पासून पी.जी. पर्यंत अनेक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. अर्थातच त्यामुळे पनवेल तालुक्यात शिक्षक बांधवांचे लक्षणीय प्रमाण आहे. या साऱ्या शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आणि संस्थाचालकांनी जर का मला साथ दिली तर पनवेलचे नष्टचक्र दूर करण्यासाठी जराही वेळ लागणार नाही.
या मेळाव्याला माजी आमदार बाळाराम पाटील,शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत,पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू,पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी,माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, पनवेल अर्बन को ऑप बँकेचे चेअर मन बाबुराव पालकर, रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा के ए बाठिया विद्यालयाचे मुख्याध्यापक बी एस माळी, या संघटनेचे माजी पदाधिकारी व्ही ए पाटील, किशोर पाटील,वि खं.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली गावित आदी मान्यवरांच्या सह शेकडो शिक्षक बांधव उपस्थित होते.
Be First to Comment