Press "Enter" to skip to content

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची योग्य पद्धत

   श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनाला जातांना श्रीगणेशमूर्तीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच वाहत्या पाण्याबरोबर ही पवित्रके सर्वदूर पोहोचतात व अनेकांना त्यांचा लाभ मिळतो. या पाण्याचे बाष्पीभवनही होत असल्याच्या कारणाने एकंदर वातावरण सात्त्विक होण्यास मदत होते. विसर्जनाच्या वेळी जेथे विसर्जन केले, तेथील माती घरी आणून ती सर्वत्र शिंपडण्याची प्रथा आहे.

    श्री गणेशमूती विसर्जनाबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्तिकेच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून आणलेले देवत्व एक दिवसापेक्षा जास्त दिवस राहूच शकत नाही. याचाच अर्थ गणेशविसर्जन केव्हाही केले, तरी श्री गणेशमूर्तीतील देवत्व दुसरे दिवशी नष्ट झालेले असते; म्हणून कोणत्याही देवाची उत्तरपूजा केल्यावर त्याच दिवशी किंवा दुसर्‍या दिवशी त्या मूर्तीचे विसर्जन होणे, हे सर्वथैव इष्ट आहे. सोयर वा सुतक असले तरी पुरोहिताकडून गणेशव्रत आचरले जाणे इष्ट आहे. त्याचप्रमाणे घरातील प्रसूतीची वगैरे वाट न पहाता ठरल्याप्रमाणे विसर्जन करणे हे शास्त्राला धरून आहे.

मूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करण्याचे महत्त्व : उत्तरपूजेनंतर मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे. उपासनाविधींमुळे गणपतीच्या तत्त्वाने समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन जलात केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच वहात्या पाण्याबरोबर ही पवित्रके सर्वदूर पोहोचतात व अनेकांना त्यांचा लाभ मिळतो. या पाण्याचे बाष्पीभवनही होत असल्याने एकंदर वातावरण सात्त्विक होण्यास मदत होते. एखाद्या ठिकाणी वहाते पाणी उपलब्ध नसल्यास मूर्तीचे विसर्जन विहिरीत करावे.

‘मूर्तीविसर्जन’ ही समस्या नाही : हल्लीच्या काळी अपुरे जलस्रोत, दूषित जल, दुष्काळ इत्यादींमुळे ‘मूर्तीविसर्जन’ ही समस्या वाटते; पण लक्षात घ्या, ‘मूर्तीविसर्जन’ ही समस्या असली, तरी ती पुढीलप्रमाणे सोडवता येते.

१. सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या हल्ली खूप वाढली आहे. त्यावर उपाय म्हणून ‘एक गाव – एक गणपति’ व शहरात ‘एक विभाग – एक गणपति’ हे सूत्र पाळून आपण गणेशोत्सव साजरा करू शकतो.
२. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न वापरता मूर्ती शाडूमातीची व नैसर्गिक रंगांनी रंगवलेलीच वापरू शकतो. प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात सहजरीत्या विरघळत नसल्याने मूर्तीचे नीट विसर्जन होत नाही.

मूर्तीदान करू नका; मूर्ती विसर्जन करा : जलप्रदूषणाचे कारण पुढे करून अंनिससारख्या धर्मद्रोही संघटना मूर्तीविसर्जनाच्या ऐवजी मूर्तीदान करण्याचे आवाहन करतात; परंतु मूर्तीदान करणे, हे अशास्त्रीय तसेच धर्मद्रोही कृत्य आहे; कारण

१. गणेश चतुर्थीस प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे, असा शास्त्रोक्त विधी आहे.
२. देवतांचे दान घेणे किंवा देणे हा देवतांचा अपमान आहे; कारण देवतांचे दान घेण्याचे किंवा देण्याचे सामथ्र्य मनुष्यात नाही.
३. गणेशाची मूर्ती म्हणजे एखादे खेळणे किंवा शोभिवंत वस्तू नव्हे की, जिचा उपयोग संपला म्हणून ती दुसर्‍याला दान म्हणून दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.