Press "Enter" to skip to content

स्वाध्याय परिवारातील लाखो तरुणांच्या सहभागातून पथनाट्यांद्वारे साजरी होणार जन्माष्टमी

मुंबई / प्रतिनिधी.

वैश्विक स्वाध्याय कार्याचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवा वर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत असतो. भगवान श्रीकृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून न करता त्याचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावेत म्हणून दादांनी युवकांना पथनाट्याची संकल्पना दिली. दादांची सुपुत्री आणि स्वाध्याय परिवाराची धुरा सांभाळणाऱ्या श्रीमती धनश्री श्रीनिवास तळवलकर (दीदी) यांच्या मार्गदर्शनाने पथनाट्याच्या माध्यमातून लाखो युवक देशविदेशात हे विचार घेऊन जात आहेत. जन्माष्टमी निमित्त सादर होणाऱ्या या पथनाट्यांचा हा प्रयोग गेली २२ वर्षे निरंतर सुरू आहे.

यंदा देशभरातील १५ राज्यांत तसेच इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आखाती देश यांसारख्या विविध देशांतही युवकांच्या जवळपास २०,००० टीम्स म्हणजे २ लाख युवक’ मेरे संग संग’ या पथनाट्यातून सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त करणार आहेत. विविध भाषांमधून ही पथनाट्ये १७ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट, २०२४ या काळात सादर करण्यात येतील. विशेष म्हणजे कोणत्याही प्रलोभनाशिवाय, अत्यंत निरपेक्षपणे आपलं शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून आणि या सर्वांतून वेळ काढून हे युवक पथनाट्य सादर करतात.

आपल्या सर्वांना भगवंत हवाय पण त्याला केवळ मंदिरात किंवा आकाशातच ठेवायचंय. ती परमशक्ति आपल्याबरोबर सुद्धा आहे हे आपण विसरून गेलो आहोत. भगवान सदैव आपल्याबरोबर आहे, त्याच्याशिवाय काहीच संभवत नाही, ती शक्ति माझ्या हृदयात राहून मला प्रेमाने सांभाळते. त्या शक्तीचे स्मरण करायला हवे, तिच्याबद्दल कृतज्ञ राहायला हवे, असा संदेश हे पथनाट्य देते.

आज दुर्दैवाने जन्माष्टमी फक्त दहीहंडीची उंची, थर आणि त्यासाठी लाखोंची बक्षिसे, सेलिब्रिटींची रेलचेल, डीजे च्या दणदणाटात नाच गाणी इतक्यावरच सीमित झाली आहे. श्रीकृष्ण आणि त्यांचे विचार जन्माष्टमी उत्सवात कुठे दिसतच नाहीत. अशा विपरीत काळात स्वाध्याय परिवाराच्या युवकांची जन्माष्टमी निमित्त प्रतिवर्षी सादर होणारी ही पथनाट्ये काहीतरी सकारात्मक आणि रचनात्मक करण्याचा प्रयास करत असतात.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.