विचुंबे ग्रामपंचायतिच्या संयुक्त विद्यमाने केले होते आयोजन
पनवेल / प्रतिनिधी.
तालुक्यातील विचुंबे ग्रामपंचायती मध्ये स्वयंम फाउंडेशन च्या वतीने महिलांसाठी घनकचरा व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.बुधवार दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ही कार्यशाळा संपन्न झाली. घनकचरा व्यवस्थापन तज्ञ तथा श्री आस्था महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनी बोरुडे यांनी या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वयं फाउंडेशन आणि विचुंबे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वयं फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ऍड निलेश पावस्कर, संचालिका अमृता ढवळे, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर, सरपंच प्रमोद भिंगारकर यांची यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती. अश्विनी बोरुडे यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे गांभीर्य,त्याची निर्माण झालेली गरज आणि घनकचरा व्यवस्थापनामध्ये घर सांभाळणाऱ्या गृहिणीचे महत्त्वपूर्ण योगदान या विषयावर विस्तृत माहिती दिली. तसेच घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरण या अत्यंत अभिनव संकल्पनेबाबत उपस्थितांना अवगत केले. विचुंबे ग्रामपंचायत हद्दीतील व पंचक्रोशीतील शेकडो महिलांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.पुढील तीन दिवस या कार्यशाळेच्या माध्यमातून माता-भगिनींना घनकचरा व्यवस्थापनाचे व त्यायोगे रोजगार निर्मितीचे शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे.
स्वयंम फाउंडेशन ही सेवाभावी संस्था २०११ पासून कार्यरत असून प्रत्येक वर्षागणिक दमदार कामगिरी करत आहे. बालक महिला आणि युवक या संवर्गाच्या सक्षमीकरणाकरता ही संस्था झटून कार्य करत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड निलेश पावसकर यांनी यावेळी उपस्थित महिलांना त्यांच्या न्याय हक्कांच्या बाबत मार्गदर्शन केले. सध्याच्या परिस्थितीत महिलांवर होत असणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महिलांनी आपल्या अधिकारांच्या बाबतीत सजग आणि सतर्क राहण्यासाठी आवश्यक त्या न्यायिक अधिकारांची त्यांनी अत्यंत सुलभ पद्धतीने माहिती विशद केली. तर प्रमोद भिंगारकर यांनी येणाऱ्या गणेशोत्सवात घनकचरा व्यवस्थापन करून निर्माण होणाऱ्या निर्माल्यातून खत निर्मिती करणार असल्याची घोषणा केली. यासाठी जागा निश्चिती करून विचुंबे ग्रामस्थांनी या अभियानात हिरीरीने सहभागी होण्याचे सगळ्यांना आवाहन केले.
आपली प्रतिक्रिया देताना सय्यद अकबर म्हणाले की स्वयंम फाउंडेशन सारख्या सेवाभावी आणि निस्वार्थ पद्धतीने काम करणाऱ्या संस्था ही काळाची गरज आहे. वाढत्या नागरीकीकरणामध्ये घनकचरा व्यवस्थापन हे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या समोरचे एक आव्हान आहे. परंतु आपण जर का आपल्या घरापासून त्याची सुरुवात केली तर या फार मोठ्या प्रक्रियेकरता आपण आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला हातभार लावणार आहोत याची जाण आपल्याला हवी.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथींच्या समवेत विचुंबे ग्रामपंचायत सदस्य श्रावणी भोईर, अतुल भोईर,प्रमिला भोईर,गौरव निकाळजे यांच्या समवेत शेकडो महिलांची उपस्थिती होती.तसेच या कार्यक्रमास छत्रपती महिला ग्रामसंघ पदाधिकारी व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
Be First to Comment