काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांची आयुक्तांकडे मागणी
पनवेल / प्रतिनिधी.
येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या समोर वाहन तळ उभारण्याचे काम सुरू आहे. जोपर्यंत हा वाहन तळ नागरिकांकरता खुला होत नाही तोपर्यंत बाजारहाटासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने नाट्यगृह परिसरात पार्क करून द्या अशी मागणी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे.
पूर्वाश्रमीच्या सरस्वती विद्यामंदिर प्रांगणामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या वतीने वाहनतळ उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. परंतु या ठिकाणी काम सुरू असल्यामुळे नागरिकांना त्यांची वाहने पार्क करता येत नाहीत. पनवेल परिसरामध्ये बाजारहाटासाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने पार्क करण्यासाठी तात्कालीक स्वरूपामध्ये नाट्यगृहासमोरील जागा खुली करून द्यावी अशी विनंती पनवेल शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. तूर्तास या ठिकाणी बांधकाम सुरू असल्यामुळे नागरिकांना वाहने पार्क करण्यापासून अटकाव करण्यात येतो. या परिसरामध्ये आठ राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँका आहेत. के. गो. लिमये वाचनालय, महानगरपालिकेची व्यापारी संकुले, घाऊक आणि किरकोळ बाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये जा असते.तसेच ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिर, बालाजी मंदिर, जैन मंदिर, दत्त महाराज मंदिर, संतश्रेष्ठ तुकोबा महाराजांचे स्मारक, बालाजी मंदिर या ठिकाणी देखील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. या सगळ्यांना तूर्तास गाड्या पार्क करण्यासाठी फार मोठ्या जिकरीचा सामना करावा लागतो.फडके नाट्यगृह समोरील पार्किंग मध्ये महानगरपालिकेच्या गाड्या पार्क केल्या जातात. नाट्यगृहात बेसमेंट पार्किंग देखील उपलब्ध आहे. त्यामुळे सरस्वती विद्यामंदिर प्रांगणामध्ये वाहनतळ निर्माण करेपर्यंत नाट्यगृहातील जागेवरती नागरिकांना गाड्या पार्क करून द्याव्यात अशी मागणी सुदाम पाटील यांनी केली आहे.
Be First to Comment