Press "Enter" to skip to content

यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी पनवेलमध्ये काढण्यात आला आक्रोश मोर्चा

पनवेल :प्रतिनिधी

उरण मधील यशश्री शिंदे आणि नवी मुंबई येथील अक्षता म्हात्रे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी २९ जुलै रोजी पनवेलमध्ये सर्वपक्षीय तसेच समाजातील विविध सामाजिक संघटना तसेच शालेय विद्यार्थींनी यांनी एकत्रित येवून आक्रोश मोर्चा काढला. यावेळी या दोन्ही घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले. पाऊस पडत असताना देखील पावसाची तमा न बाळगता मोर्चा स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. 

       

उरण शहरातील यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृण हत्या झाल्याच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे नवी मुंबई येथील अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या अत्याचार व हत्येविरोधात पनवेल शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे पनवेल परिसरातील विविध राजकीय पक्षाच्या महिला आघाडी तसेच विविध सामाजिक संघटना व शालेय विद्यार्थ्यांनी एकत्रित येवून जनआक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये पनवेल महापालिकेचे मा.विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह महिला आघाडीच्या कल्पना पाटील, रेवती सकपाळ, प्रमिला कुरघोडे, अर्चना कुळकर्णी, माजी नगरसेविका अनुराधा ठोकळ, प्रिती जॉर्ज, निर्मला म्हात्रे, विद्या चव्हाण, शशिकला सिंह, माधुरी गोसावी, सुदाम पाटील, हेमराज म्हात्रे, अच्युत मनोरे, गणेश कडू, प्रवीण जाधव, लतिफ शेख आदींसह मोठ्या संख्येने पनवेलवासिय या मोर्चात सहभागी झाले होते. व त्यांनी दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक वर चालविण्यात यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे. यातील आरोपींना आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला तशीच सजा देतो असे आक्रोश मोर्चातील महिलांनी सांगितले. यावेळी नको आम्हाला दीड हजार, महिलांना द्या सुरक्षेचा आधार या घोषणांनी परिसर दणाणला होता. आज शहरामध्ये महिला सुरक्षित नाही त्यामुळे शासनाने कायदे कडक करणे गरजेचे आहे आणि अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या गुन्ह्यातील आरोपींना भर चौकात फाशी द्यायला हवी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.