बँकेत येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्यांची आरटीओला ऍलर्जी
( प्रतिनिधी )
कोणी वंदा किंवा कोणी करा निंदा पण “वसुली हाच आमचा धंदा” याच उप्तीप्रमाणे सध्या वाहतूक विभाग काम करताना दिसत आहे. रस्त्यावर ज्या ठिकाणी ट्राफिक होण्याची शक्यता आहे तिथे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी उभे असलेले वाहतूक पोलीस आपणास क्वचितच दिसतील परंतु वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यासाठी जथ्थ्यायाने उभे असलेले वाहतूक पोलीस आपणास सर्वत्र दिसतील. त्याचबरोबर गरज नसतानाही काही ठिकाणी सर्रासपणे नो पार्किंगचे फलक लावलेले आपणास दिसतात ते केवळ टोचन च्या गाडीचा धंदा होण्यासाठीच. या गोष्टीचा एक नमुना म्हणून आपण नवीन पनवेल येथील माथेरान रोड कडे पाहावे लागेल. या ठिकाणी एचडीएफसी सर्कल ते नवीन पनवेल पोलीस चौकी यादरम्यान किमान २५ ते २० बँका आहेत. त्याचप्रमाणे अनेक खाजगी कार्यालय देखील आहेत. परंतु येथे जाण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाला पार्किंग करायची मात्र सोय नाही. तसा हा रस्ता प्रशस्त आहे त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला फक्त सिंगल लाईन लावून वाहने व्यवस्थित पार केली तर वाहतुकीला कोणताही अडसर या ठिकाणी होत नाही. परंतु असे असताना देखील वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी नो पार्किंग चे फलक लावले आहेत. त्यामुळे येथील बँकांमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना नाहक भुर्दंड पडत आहे. कारण ग्राहकांना बँकेत जाणे तर गरजेचं आहे परंतु पार्किंग साठी दुसरीकडे कुठे जागाच नाही मग अशा वेळेला बाहेर रस्त्यावरच गाडी लावून जावे लागते. नेमका सर्वसामान्य माणसाच्या या मजबुरीचा फायदा घेऊन वाहतूक पोलिसांच्या “टोचन चा धंदा” जोमाने चालविला जातो. या ठिकाणी नऊ पार्किंगच्या फलकांवर सम विषम तारखा लावल्या आहेत पण मग प्रश्न हाच आहे जर सम तारखेला गाडी लावल्याने या ठिकाणी ट्राफिक होत नाही तर विषम तारखेला गाडी लावल्याने कशी काय होईल ? याचा अर्थ सरळ आहे टोचनच्या गाडीचे “अर्थकारण” चालवण्यासाठी लावण्यात आलेले हे सापळे आहेत. वाहनधारकांनी जर सिंगल लाईन सोडून डबल लाईन लावून गाडी पार्क केली असेल तर त्यावर आवश्यक कारवाई करा पण विनाकारण वाहतुकीला अडथळा होत नसतानाही उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करू नका. ही माफक अपेक्षा सर्वसामान्य वाहनधारकांची आहे. वाहतूक पोलिसांच्या अशा प्रकारे फक्त धंदा करण्याच्या प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य नागरिकांना आता रोष उत्पन्न होऊ लागला आहे याची प्रशासनाने ताबडतोब नोंद घेणे गरजेचे आहे.
Be First to Comment