Press "Enter" to skip to content

फसवणूक करणाऱ्या विरोधात आई आणि बहिणीने उगारले उपोषणाचे हत्यार

चुकीची वारस नोंद केल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

पनवेल /प्रतिनिधी.
नेरे येथील वडिलोपार्जित जमीन मिळकतीची मृत्यू पत्राद्वारे जाणीवपूर्वक चुकीची वारस नोंद केल्याप्रकरणी तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी आई- बहिणींनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, पनवेल या ठिकाणी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

नेरे येथील नारायण मांडवकर यांना कुळ कायद्याने जमीन मिळाली त्यांच्या मृत्यूनंतर ती जमीन शंकर मांडवकर यांना मिळाली. वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीवर बहिणींची नावे लागणे अपेक्षित होते. मात्र मृत्यू दरम्यान सदरची जमीन त्यांच्या नातवाच्या नावे परस्पर हस्तांतरित करण्यात आली. या फसवणूक प्रकरणाचे संदर्भात कायदेशीर वारसांनी हरकती नोंदवल्या आहेत तसेच हे प्रकरण तलाठी व मंडळ अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून समजावून सांगितले होते. मात्र जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी या प्रकरणात वारसांना अंधारात ठेवल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे.त्यांनी हे हेतूपुरस्कार केल्याचे आरोप या महिलांनी केला आहे. विशेष म्हणजे ही जमीन मल्टीमॉडल कॉरिडॉरमध्ये भूसंपादित होत असल्याने याचे करोडो रुपये येणार आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी नुकतेच फसवणूक करणाऱ्याच्या आईने आणि बहिणीने उपोषण केले होते.सदरचा फेरफार नोंद तातडीने रद्द करण्यात यावा, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच मंडळ अधिकारी यांच्या निर्णयाला त्वरित स्थगिती द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या.
सदरहू प्रकरण अर्धन्यायक स्वरूपाचे असून त्यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागू होत असल्याकारणाने उपोषण मागे घेण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली. त्यामुळे फसवणूक झालेल्या आई आणि बहिणीने तूर्तास उपोषण मागे घेतले आहे. परंतु दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे या मागणीवर त्या आजही ठाम आहेत.

काय आहे प्रकरण?
मौजे नेरे तालुका पनवेल येथील सर्व्हे नंबर 341/1 ( नवीन सर्व्हे नंबर 188/1) ही जमीन मिळकत कुळ कायदा अन्वये पणजोबा नारायण रमा मांडवकर यांच्या नावे इतर अधिकारात कुळ म्हणून सात बारा सदरी नोंद होती. त्यांच्या मृत्यू नंतर फेर फार क्रमांक 1354 दिनांक 20/08/1978 अन्वये वारस नोंद होवून कुळ म्हणून तक्रार अर्जदार यांचे आजोबा शंकर नारायण मांडवकर यांच्या नावाची नोंद झाली. तक्रारदारांचे आजोबा आजोबा शंकर नारायण मांडवकर यांनी फेर फार क्रमांक 2796 दिनांक 1/12/2009 अन्वये 32 ग ची किंमत भरून त्यांचे नावाची कब्जेदार सदरी नोंद झाली.यांच्या मृत्यू दिनांक 09/12/2022 रोजी झाल्या नंतर त्यांचे वारस असलेले तक्रारदारांची आई व इतर भावंडे यांची नावे नोंद होणे गरजेचे होते. सदरहू जमीन वडिलोपार्जित आणि कुळ कायदा अन्वये मिळालेली असल्याने आजोबांना मृत्यू पत्राद्वारे हस्तांतरित करण्याचा अधिकार नाही याची पूर्ण कल्पना असताना तलाठी रसिका पाटील , मंडळ अधिकारी सानिका पाटील आणि तहसीलदार इंगळे पाटील साहेब यांनी कागदपत्रे न तपासता तसेच केलेल्या लेखी हरकती लक्षात न घेता, मृत्यू पत्राद्वारे जाणीवपूर्वक , हेतू पुरस्सार , कर्त्यव्यात कसूर करून नोंद मंजूर करण्यात आली, हे अतिशय धक्कादायक आहे. सदरहू विषयासंदर्भात अपर तहसीलदार पनवेल इंगळे पाटील साहेब यांना विचारणा केली असता , सदरहू जमीन वडिलोपार्जित आहे की नाही हे समजून येत नाही असे आश्चर्य कारक उत्तर त्यांनी दिले. हे उत्तर तहसीलदार यांच्या सारख्या उच्च पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीने दिल्यावर अर्जदार व कुटुंबीय अवाक झाले. अजून आश्चर्याची गोष्ट म्हणजे सदरहू जमिनीचे संपादन विरार अलिबाग कॉरिडॉर साठी झाले असल्याने प्रांत कार्यालयातील अधिकारी यांची त्या जमिनीची रक्कम हस्तांतरित करण्याची घाई सुरू आहे. फेर फार नोंद झाल्यानंतर, तसे पत्र तीन दिवसात प्रांत कार्यालयातून दिले गेले आहे हा निव्वळ योगायोग असू शकत नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.