Press "Enter" to skip to content

रमेश कीर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा पनवेलमध्ये शानदार मेळावा संपन्न

“लढायचं आणि जिंकायचं” या ईर्षेने पुढचे नऊ दिवस प्रचारात झोकून द्या — माजी आमदार बाळाराम पाटील.

  महाविकास आघाडीमध्ये कोणीही छोटा भाऊ नाही की कोणीही मोठा भाऊ नाही! आपण सारे एकसमानबबन दादा पाटील

  – बबन दादा पाटील


  पनवेल/ प्रतिनिधी
       येत्या २६ जून रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील चार विविध जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश कीर हे निवडणूक लढवत आहेत.त्यांच्या प्रचारार्थ पनवेल उरण महाविकास आघाडीच्या वतीने पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहामध्ये रविवार दिनांक १६ जून रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.”लढायचं आणि जिंकायचं” या ईर्षेने पुढचे नऊ दिवस प्रचारात झोकून द्या असे आवाहन यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केले तर पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन दादा पाटील यांनी आपल्या आघाडीत कुणीही लहान भाऊ नाही, कुणीही मोठा भाऊ नाही!आपण सगळे एक समान आहोत असे प्रतिपादन केले.
  मान्यवर व प्रमुख वक्त्यांनी व्यासपीठावर आपापली जागा घेतल्यानंतर पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र (देवा)पाटील, काँग्रेसचे पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, युवा सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख पराग मोहिते यांनी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा पनवेल उरण महाविकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील यांनी प्रास्ताविकातून आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की तब्बल सहा टर्म म्हणजेच ३६ वर्षानंतर काँग्रेस पक्षाचा उमेदवार ही निवडणूक लढवत आहे. असे असले तरी रमेश कीर हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. आज पनवेल मध्ये साधारण वीस हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. रायगड जिल्ह्यात ५४ हजार मतदार आहेत. हा मतदार सुशिक्षित असतो त्यांच्याकडे मतांचा जोगवा मागायला जाताना बेरोजगारी, महाराष्ट्र बाहेर जाणारे उद्योग धंदे,जुनी पेन्शन योजना हे ज्वलंत विषय मांडावे लागतील. आपल्या हातामध्ये वेळ फार कमी आहे त्यामुळे याद्यांचे विश्लेषण, प्रचार पत्रकाचे वाटप याचे नियोजन करताना आपण स्वतः उमेदवार आहोत असे समजून काम करायचे आहे. त्यानंतर सुदाम पाटील यांनी मतदानाची प्रक्रिया उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विशद केली.
  स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे नरेंद्र गायकवाड यांनी देखील मनोगते सादर केली. महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्रितपणे लढणार असून आमच्यावर जी जी जबाबदारी टाकली जाईल ती आम्ही पार पाडू असे जाहीर आश्वासन त्यांनी या मेळाव्यात दिले. त्यानंतर माजी आमदार मनोहर भोईर आपल्या मनोगतात म्हणाले की महाविकास आघाडीची वैचारिक बैठक दिवसेंदिवस भक्कम होत आहे याचे पाठबळ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना निश्चितच मिळेल. या प्रचारामध्ये आपल्याला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना खेळायचा आहे. पाच जिल्हे सात लोकसभा मतदारसंघ आणि ३९ विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या या भल्या मोठ्या मतदारसंघांमध्ये प्रचार करणं ही खरंतर तारेवरची कसरत असते. म्हणूनच आम्हाला उमेदवार भेटले नाहीत! उमेदवार येथे प्रचाराला आलेच नाहीत! असे म्हणत कोणीही नाराज होऊ नका. उरण मधून आम्ही सतराशे पेक्षा जास्त मते रमेश कीर यांना मिळवून देऊ असा मला ठाम विश्वास आहे.
  आपल्या भाषणामध्ये पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन दादा पाटील म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता पार्टीची घोडदौड रोखण्यामध्ये यशस्वी झालो. हे सारे तुम्हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमाच्या जोरावरती शक्य झाले म्हणून तुमच्या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्रात शरद पवार साहेब,उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचा करिष्मा चालत असताना आपला बालेकिल्ला असणाऱ्या कोकणात मात्र आपली पिछेहाट झालेली आहे. ती भरून काढण्याची सुवर्णसंधी या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेली आहे. आमच्या पक्षाचे किरण जैन यांनी मोठी तयारी करून निवडणूक लढविण्यास ते सज्ज झाले होते. परंतु महाविकास आघाडी म्हणून येणाऱ्या प्रत्येक निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो आणि म्हणूनच मनाचा मोठेपणा दाखवत किरण जैन यांनी माघार घेतली आणि रमेश कीर यांच्या प्रचाराचे काम करण्याचे देखील आश्वासन दिले. आमच्या कोणाच्याही मनात जराही नाराजगी नाही.
  माजी आमदार बाळाराम पाटील आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले की हाती आलेल्या लोकसभा निकालाने मी खुशही होणार नाही किंवा नाराजही होणार नाही. संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना मी सांगितले होते की तुम्हाला खालच्या तीन मतदारसंघातून रिकाम्या हाती पाठवणार नाही. तीनही विधानसभा मतदारसंघातून अवघ्या १६८ मतांनी वाघेरे पिछाडीवर राहिले. महाराष्ट्रात शरद पवार, राहुल गांधी,उद्धव ठाकरे यांचा करिष्मा पाहायला मिळत असताना वैचारिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची भूमी असणाऱ्या कोकण प्रांतामध्ये महाविकास आघाडीला पराभव पहावयास लागला.ही अत्यंत गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर “लढायचं आणि जिंकायचं” या इर्षेने पुढच्या नऊ दिवसात स्वतःला रमेश कीर यांच्या प्रचारात झोकून द्या. ते पुढे म्हणाले की शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचे ७० ते ८० टक्के आमदार आणि पदाधिकारी फोडून देखील त्यांनी नांगी टाकली नाही. प्रचारामध्ये महाराष्ट्र उभा आडवा पिंजून काढला आणि राजकारणाचा सारीपाट बदलून दाखविला. त्यामुळेच आज मोदी सरकार गेले आणि एनडीए सरकार सत्तेवर आले असे म्हणण्याची पाळी आली आहे. ७२० किलोमीटर लांबीच्या या मतदारसंघामध्ये जवळपास प्रत्येक तालुक्यात मी फिरलेलो आहे. भारतीय जनता पार्टी येथे पैशाचा पूर आणेल. परंतु “५० खोके एकदम ओके” अशा गद्दारांना “बिना खोके एकदम ओके” अशी चपराक तुम्ही कार्यकर्त्यांनी लगावली आहे. थांबलेली शिक्षक भरती, जुनी पेन्शन योजना, तरुणांचा बट्ट्याबोळ करणारी अग्नीविर योजना, महाराष्ट्र बाहेर जाणारे उद्योग धंदे, वाढती बेरोजगारी हे मुद्दे घेऊन आपल्याला मतदारांच्या समोर जायचे आहे. दिंडोरी मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार केंद्रीय मंत्र्याला धोबीपछाड देतो, अशोक चव्हाण भाजप मध्ये जाऊन देखील नांदेडमध्ये आपला दणदणीत विजय होतो, विखे पाटलांसारख्या मोठ्या सरंजामांना निलेश लंके यांच्या रूपाने एक सामान्य कार्यकर्ता पराभूत करतो ही आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी उदाहरणे आहेत. त्यामुळे पुढच्या नऊ दिवसात जोमाने कामाला लागा.
  या मेळाव्यामध्ये मंचावर माजी आमदार बाळाराम पाटील, बबन दादा पाटील, उरण चे माजी आमदार मनोहर भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष सदस्य आर सी घरत, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कमांडर कलावत, माजी राजीप अध्यक्ष ए डी पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील,कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन बाबुराव पालकर, स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे, नरेंद्र गायकवाड, प्रकाश म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मिलिंद पाडगावकर, रघुनाथ पाटील, युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सहसचिव अवचित राऊत, तालुकाप्रमुख विश्वास पेटकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. तर मेळव्याला मार्गदर्शन करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे,जेष्ठ काँग्रेस नेते तथा आयुर्वेदाचार्य डॉक्टर भक्ती कुमार दवे, माजी नगरसेवक अरविंद सावळेकर, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, नैना प्रकल्प बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके,काँग्रेस पक्षाच्या न्याय व विधी सेलचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट के एस पाटील, डॉ हितेन शहा, माजी नगरसेवक लतिफ शेख, शेकाप पनवेल शहर चिटणीस नंदू भोईर आदी मान्यवर , मित्र पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  Be First to Comment

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  Mission News Theme by Compete Themes.