Press "Enter" to skip to content

कोकण पदवीधर निवडणूकीत महाविकास आघाडी विजयी होणार

महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी व्यक्त केला विश्वास

…अखेर शिवसेना ( उ बा ठा) उमेदवाराचा अर्ज मागे

पनवेल / प्रतिनिधी
आगामी कोकण पदवीधर निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. या निवडणुकीत भाजपकडून निरंजन डावखरे हे महायुतीचे उमेदवार आहेत, तर सुरुवातीला काँग्रेसचे रमेश कीर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला. मात्र त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे पक्षाचे किशोर जैन यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. असे असले तरीही काँग्रेस पक्षाचा प्रयत्न महाविकास आघाडी तर्फे निवडणूक लढण्यावरच होता . १२ जून रोजी शिवसेनेने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या निवडणूकीला आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाऊ असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांनी व्यक्त केला.


     येत्या २६ जूनला कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणुक प्रक्रिया पार पडणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी कडून निवडणूक लढली जाणार आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश कीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अनुषंगाने मंगळवारी (दि.११ जून) रमेश कीर यांनी पनवेल तालुक्यातील नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती गण स्तरावर बैठका तसेच मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठीही घेण्यात आल्या. दरम्यान शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित बैठकीत उमेदवार रमेश कीर व जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
यावेळी रमेश किर म्हणाले, दीर्घ काळानंतर आम्ही हि निवडणूक लढवत आहोत. गेले ६ महिने आम्ही मतदारसंघात मतदारांची नोंदणी करत आहोत. कार्यकर्त्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा उत्साह दिसत आहे. त्याचबरोबर संघटना देखील जोमाने कामाला लागलेली दिसत आहे. नागरिकांचे अनेक प्रश्न खोळंबले आहेत. यात प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना राबवण्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत. शिक्षकांच्या प्रश्नांना प्रधान्य देणार आहोत. पदवीधरांसाठी असणारे यूपीएससी आणि एमपीएससीच्या शिक्षणाबाबत जिल्हानिहाय प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येक जिल्ह्यातील उद्योग केंद्रांना भेटी देणे, त्यांतील किती पदवीधराना संधी मिळाली आह हे बघणे, शासकीय धोरणावर लक्ष ठेवणे हे प्रामुख्याने प्रश्न आहेत. सुशिक्षित बेकारांचा प्रश्न ऐरणीवर असून त्यादृष्टीने प्रयत्न प्रयत्न करणे आवश्यक आहे.
याप्रसंगी पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटिल, जेष्ठ नेते जी आर पाटील, तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, माजी नगरसेवक लतीफ शेख, शशिकांत बांदोडकर, हेमराज म्हात्रे, निर्मला म्हात्रे, माजी नगरसेविका शशिकला सिंह, विजय चव्हाण, अमित लोखंडे, डॉ.अमित दवे, माया आहिरे, जयश्री खटकाले आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोट:
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला संपूर्ण देशामध्ये उत्तम यश मिळाले. मतदारांच्या उत्तम प्रतिसादामुळे राज्यात महाविकास आघाडी सरस ठरल्याचे साऱ्यांनीच अनुभवले. त्यामुळे या निवडणुकीती देखिल महाविकास आघाडीला पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. लोकसभा निवडणुकीतून काँग्रेसने पुन्हा एकदा आपले अस्तित्व सिद्ध केले असून धनशक्तीपुढे जनशक्तीचा विजय होतो हे निश्चित झाले. त्यामुळे कोकण पदवीधर निवडणुकीतही महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील यात शंका नाही.

  • सुदाम पाटील, पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.