पनवेल / प्रतिनिधी दी.२३
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने २४ मे २०२३ रोजी पदभार स्विकारला होता.आज रोजी २४ तारखेला विद्यमान संचालक मंडळाच्या कारभाराची वर्षपूर्ती होत आहे. बाजार समितीच्या आवारामध्ये संचालक मंडळाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला असता या मंडळाचे पहिले वर्ष बऱ्याच अंशी यशस्वी राहिले असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यप्रणालीमुळे शेतकरी बांधव,व्यापारी,अडते,कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात समाधानाचे वातावरण पाहायला मिळते.
मा आ विवेक पाटील यांच्या आशीर्वादाने तर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंतभाई पाटील व माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या खमक्या मार्गदर्शनाने तसेच सुप्रसिद्ध उद्योगपती जे एम म्हात्रे व शेकाप पनवेल विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष काशिनाथ पाटील यांच्या सहकार्याने विद्यमान संचालक मंडळाची बिनविरोध निवड मागच्या वर्षी झाली होती. शेतकरी कामगार पक्षाचे माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरत हे सभापती पदी विराजमान झाले तर सुनील सोनावळे यांची उपसभापती नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे उर्वरित पंधरा संचालक पहिल्यांदाच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक झाले. म्हणूनच एकूण १७ संचालक असणाऱ्या या मंडळाने सुरुवातीचे दोन महिने एकंदरीत कामकाज व बाजार समितीचे नियम-निकष समजून घेण्यावर भर दिला. त्यानंतर सभापती नारायण शेठ घरत यांचे अध्यक्षतेखाली बाजार समितीचे आवारातील संबंधित शेतकरी बांधव, व्यापारी व कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेत त्यांच्या पुढील असणारे प्रश्न जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
विद्यमान संचालक मंडळाचे उल्लेखनीय कार्य म्हणजे अत्यंत शानदार पद्धतीने दिमाखदार गणेशोत्सव साजरा करणे. कोरोना काळातील निर्बंधामुळे पनवेल कृषी उत्पन्न बाजार आवारातील सुप्रसिद्ध गणेशोत्सव मर्यादित स्वरूपामध्ये गेले काही वर्ष साजरा होत असे. नूतन संचालक मंडळाने सर्वांना एकत्र घेत अत्यंत नेत्रदीपक गणेशोत्सव साजरा केल्यामुळे त्यांच्यावर स्तुती सुमानांचा वर्षाव होत होता. त्यानंतर येणाऱ्या दीपावली उत्सवामध्ये कर्मचाऱ्यांना भरीव सानुग्रह अनुदान दिल्यामुळे देखील विद्यमान संचालक मंडळाचे कौतुक होत होते. वास्तविक महाराष्ट्रातील अन्य बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे. परंतु पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन आयोग लागू होत असल्यामुळे त्यांना अल्प मोबदल्यावर नोकरी करावी लागते. या गोष्टीची सहानुभूतीपूर्वक दखल घेऊन विद्यमान संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांना भरीव सानुग्रह अनुदान दिले होते. विद्यमान संचालक मंडळाच्या या निर्णयाने कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
संचालक मंडळाने बाजार समितीच्या आवारातील रस्ते कॉंक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर केलेला असून त्याला संबंधित खात्याची मंजुरी देखील मिळविली आहे. तांत्रिक अनुमत्यांची प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन येथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे समजते. तसेच पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये फळविक्रेत्यांकरता खास “फळ बाजार” उभारण्याचे नियोजन विद्यमान संचालक मंडळ करत आहे. भाजी बाजार आणि फळबाजार वेगळा केल्यामुळे ग्राहक,व्यापारी, फळ बागायतदार, अडते या साऱ्यांनाच ते सोयीचे ठरणार आहे.
विशेष प्रशंसनीय म्हणजे विद्यमान संचालक मंडळाने शेतकरी, व्यापारी, आडते, कर्मचारी या सर्वांच्या सोबत उत्तम समन्वय राखल्याने मागील वर्षीच्या तुलनेत बाजार समिती उत्पन्न मध्ये चालू वर्षात भरीव वाढ झालेली आहे. या संचालक मंडळाने आगामी वर्षांमध्ये मुख्य कार्यालयाच्या शेजारील पॅडी मार्केट इमारतीचे ठिकाणी सुसज्ज शॉपिंग सेंटर कार्यान्वित करण्याचा मानस ठेवला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये विजेचे वाढलेले दर व विजेचा होणारा वाढता वापर यामुळे आर्थिक भार पडू नये या सजग हेतूने विद्यमान संचालक मंडळाने सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे. या योगे पर्यावरण पूरक वीज वापर वाढेल तसेच सदरची ऊर्जा प्रणाली तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त असल्यामुळे बाजार समितीला त्याचा भविष्यात फायदा होणार आहे.
विद्यमान संचालक मंडळाने तूर्तास असलेले बाजार आवाराचे पुनर्विकास आराखडा निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे.यामध्ये सर्व सुसज्ज व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त बाजार आवार बनविण्यावर भर दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त वाढलेल्या लोकसंख्येमुळे तूर्तास असलेले बाजार आवार कमी पडते आहे. म्हणून विद्यमान संचालक मंडळाच्या वतीने माननीय रायगड जिल्हाधिकारी महोदय, माननीय आयुक्त पनवेल महानगरपालिका, आणि सिडको व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे पत्र व्यवहार करून अतिरिक्त ५० एकर जागेची मागणी केलेली आहे. सदरहू जागा उपलब्ध झाल्यानंतर सर्व सोयींनी युक्त “निर्यात भवन” उभारण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. तसेच फळांवर प्रक्रिया करणारी मशिनरी, आधुनिक प्रकारच्या सुसज्ज यंत्रणा, अत्याधुनिक सोयी सुविधा आदींनी युक्त “हाय टेक बाजार आवार” निर्माण करण्याचे ध्येय विद्यमान संचालक मंडळाने डोळ्यापुढे ठेवले आहे.
विद्यमान संचालक मंडळाच्या प्रामाणिक तळमळीचे प्रतिबिंब सध्या बाजार आवारामध्ये झालेल्या सकारात्मक बदलांमध्ये दिसत आहे. आगामी काळामध्ये सभापती नारायण शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले हे संचालक मंडळ त्यांचे इप्सित धेय्य निश्चितच साध्य करेल यात जराही दुमत नाही.
पनवेल बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची यशस्वी वर्षपूर्ती
More from UncategorizedMore posts in Uncategorized »
Be First to Comment