पनवेलच्या चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाच्या वतीने दरवर्षी केले जाते रामनवमी सोहळ्याचे आयोजन
पनवेल / प्रतिनिधी.
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी राम नवमी साजरी केली जाते. ही तिथी प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्म दिवसाची तिथी असल्याने देशभरात बुधवार दिनांक १८ एप्रिल रोजी राम नवमीच्या निमित्ताने श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. पनवेल मधील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये शंभर पेक्षा अधिक वर्षे कालखंडापासून रामनवमी पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. यंदाचे वर्षी देखील मोठ्या उत्साहात भक्तीपूर्ण वातावरणात आणि पारंपारिक चालीरीतीप्रमाणे श्रीराम जन्म सोहळा साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्यपूर्वकाळात येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाची १९२२ साली स्थापना करण्यात आली. समाजाची स्थापना होण्यापूर्वीपासूनच या मंदिरात सीकेपी समाजाच्या वतीने राम नवमी साजरी केली जात असे. शतकाहुनही अधिक वर्षांची परंपरा असणारा हा सोहळा पनवेलची एक ओळख बनला आहे. सीकेपी समाजाच्या स्नेहश्री महिला मंडळाच्या वतीने सुश्राव्य गीत सेवा अर्पण केली जाते. सांगितिक पूजनाने श्री राम जन्म सोहळ्याला सुरुवात होते.
या वर्षी गणेश स्तुती सादर करून सांगीतिक पूजेस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर परंपरेनुसार सुंदर फुलांनी सजविलेल्या छोटेखानी शिस्वी लाकडाच्या पाळण्यात प्रभू श्रीरामांची मूर्ती झुलविण्यात आली.
यंदाचे वर्षी श्री संतोष देशपांडे व सौ.कोमल देशपांडे या उभयतांच्या हस्ते श्री राम पूजन संपन्न झाले. ठीक १२ वाजून ४० मिनिटांनी उपस्थित माता-भगिनींनी श्री रामाचा पाळणा झुलवत सुप्रसिद्ध
“राम जन्मला ग सखे” हे पाळणा गीत सादर केले. त्यानंतर प्रभू श्रीरामांची महाआरती संपन्न झाली.आरतीनंतर मिलिंद देशपांडे यांनी केलेल्या पारंपारिक सुंठवड्याचा प्रसाद सगळ्यांना वाटण्यात आला. स्नेहश्री महिला मंडळाच्या गौरी राजे, स्मिता सबनीस, संपदा देशपांडे, वैशाली कुळकर्णी ,कविता चित्रे, अश्विनी देशमुख, स्मिता कुळकर्णी, स्नेहा दिघे, अनिता कुळकर्णी, रोहिणी देशपांडे, श्रद्धा कुळकर्णी यांनी सुंदर रामगिते उपस्थितांसमोर सादर केली. सोहळ्यानंतर सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.
सीकेपी समाज पनवेलचे अध्यक्ष योगेश राजे व त्यांच्या तमाम विश्वस्त सहकारी व पदाधिकाऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाणारा हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित केला होता. समाजातील भाविक मोठ्या भक्ती भावाने गोड शिऱ्याचा प्रसाद करून त्याचा प्रभू श्रीरामचंद्रांना नैवेद्य अर्पण करत असतात.सोहळ्याची ख्याती ऐकून बी पी मरीन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देखील उत्साहाने सोहळ्यात सहभागी होत त्यांच्या वतीने केळी आणि हलव्याचा प्रसाद प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी अर्पण केला. सीकेपी समाज जरी या पारंपारिक ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करत असला तरी देखील पनवेल पंचक्रोशीतील
सर्वजातीय भाविक हजारोच्या संख्येने येथे दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत असतात.
Be First to Comment