पुस्तकांची गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत
पनवेल / प्रतिनिधी.
भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. पनवेल तालुक्यातील वारदोली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत अनोख्या पद्धतीने गुढी उभारण्यात आली होती. अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांची गुढी उभारून या शाळेत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.
या शाळेतील उपशिक्षिका ज्योती किसन भोपी यांच्या पुढाकाराने राबविलेल्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गुढीपाडव्यानिमित्त उभारल्या जाणाऱ्या गुढीतील प्रत्येक वस्तूला एक वैशिष्ठ्य असते. यातील कलश हे मांगल्याचे प्रतीक असते, रेशमी वस्त्र हे ऐश्वर्यप्राप्तीचे प्रतीक असते. कडुलिंबाचा पाला आरोग्याचे तर साखरेच्या गाठी हे माधुर्याचे प्रतीक असते. उंच गुढी उभारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बांबूच्या काठीला आधार किंवा स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. कुणाही विद्यार्थ्याला आयुष्यात स्थैर्य हवे असेल तर त्याचा शिक्षणाचा पाया भक्कम असला पाहिजे. याच उदात्त हेतूने स्थैर्याचे प्रतीक असलेल्या बांबूच्या ऐवजी स्थिर जीवन प्राप्त करण्याचा मूलभूत पाया असणाऱ्या शिक्षण साहित्याची गुढी उभारून विद्यार्थ्यांना सूचक संदेश देण्यात आला.
विशेष उल्लेखनीय म्हणजे जून महिन्यात इयत्ता पहिली प्रवेशास दाखलपात्र असणारा भावी विद्यार्थी सार्थक सचिन चौधरी याचे औक्षण करून नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. एकीकडे जिल्हा परिषद शाळांचा घसरता पट हा गंभीर विषय बनत असताना दुसरीकडे उपशिक्षिका ज्योती भोपी यांच्या अशा प्रकारच्या नाविनपूर्ण संकल्पनांना राज्य पातळीवर मूर्त आकार दिला तर पटसंख्या समस्येवर प्रभावी तोडगा निघू शकेल.
वारदोली येथील शाळेत उपशिक्षिका ज्योती भोपी यांनी विद्यार्थ्यांना गुढीपाडवा सणाचे महत्व विशद करून सांगितले. गुढीपूजनानंतर सर्व विद्यार्थ्यांनी खाऊचा आस्वाद घेतला.
Be First to Comment