Press "Enter" to skip to content

नववर्ष स्वागत समितीच्या वतीने सलग २५ व्या वर्षी गुढीपाडव्याला शोभायात्रेचे आयोजन

नवभारत घडवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा!!

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले उपस्थितांना आवाहन

पनवेल (प्रतिनिधी)
       नवीन वर्षामध्ये सर्व मंगल घडत राहो, आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करत आहात; त्या क्षेत्रात पराक्रम करा तसेच हिंदु राष्ट्र आणि नवभारत घडवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा, अशा शुभेच्छा आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल मध्ये गुढीपाडव्या निमीत्त काढण्यात आलेल्या शोभायत्रेत सर्व नागरीकांना दिल्या.
           पनवेल शहराची परंपरा असलेली शोभायात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. गुढीपाडव्यानिमीत्त गेल्या २५ वर्षांपासून नववर्ष स्वागत समितीच्यावतीने भव्य शोभायात्रा काढण्यात येते. त्यानुसार यंदाच्या वर्षीही हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या शोभायात्रेत प्रभू श्री रामरथ, लेझीम पथक, ढोल पथक, ध्वज पथक, विविध चित्ररथ, झांज पथक तसेच पारंपारीक वेषभूषा करून पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
           हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याकरीता नववर्ष स्वागत समितीच्या वतीने गुढी पाडव्यानिमीत्त भव्य शोभायात्रा पनवेलमध्ये काढण्यात येते. १९९८ पासून ही परंपरा अविरत सुरु असून यंदाचे हे या शोभायात्रेचे २५ वे वर्ष होते. या शोभायात्रेला पनवेल शहरातील वडाळे तलावापासून सुरुवात झाली. गावदेवी पाडा, दांडेकर हॉस्पीटल, स्वामी हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज पथ, आदर्श लॉज, जुने प्रांत ऑफीस, गावदेवी पाडा, धुतपापेश्वर कॉर्नर, महात्मा फुले मार्ग, श्री विरुपाक्ष महादेव मंदीर, जय भारत नाका, अन्नपूर्णा चौक, लोकमान्य टिळक मार्ग असे मार्गक्रमण करत स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात शोभायात्रेची सांगता झाली. या यात्रेत महिला तसेच लहान चिमुकले पारंपारीक वेशभूषा करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच विविध संस्थांच्यावतीने यात्रेदरम्यान सामाजिक विषयांसदर्भात जनजागृती करण्यात आली तर विविध मंडळांच्यावतीने यात्रेमध्ये आलेल्या नागरीकांना आंब्याचे पन्हे, पाणी, सरबताचे वाटप करण्यात आले. नववर्ष स्वागत शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून ऐक्याचा संदेश देण्यात आला. या शोभायात्रेत बालकांचा सहभाग हा सर्वांचे लक्ष वेधुन घेत होता. तर पनवेलच्या युवानाद ढोल पथकाच्या वादनाने परिसर दुमदुमला होता. या शोभायात्रेनिमीत्त १ ते ७ वर्ष, ८ ते १५ वर्ष आणि खुल्या गटात वेशभुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विजयी झालेल्यांना आमदार प्रशांत ठाकूर, भाजपे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आयोजक अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्याहस्ते बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
          या यात्रेमध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, भाजपचे पनेवल शहर अध्यक्ष अनिल भगत, शहर सरचिटणीस अमित ओझे, चारुशीला घरत, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचीता लोंढे, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, संजय जैन, संजय भगत, सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, चंद्रकांत मंजुळे, युवा मोर्चाचे चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष सुमीत झुंझारराव, केदार भगत, प्रितम म्हात्रे, रुपेश नागवेकर, स्वाती कोळी, माधुरी गोसावी, उमेश इनामदार, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर यांच्यासह विविध संस्था, मंडळांचे पदाधिकारी आणि पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.