Press "Enter" to skip to content

वारदोली राजीप शाळा ठरली पनवेल तालुक्यातील सर्वोत्कृष्ट शाळा


पनवेल/ प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने नुकतीच शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील निकषांच्या आधारे जिल्ह्यातील १५ तालुका निहाय सर्वोत्कृष्ट शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील रा जी प शाळा वारदोली ही सर्वोत्कृष्ट शाळा ठरली आहे. रा जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी पंधरा तालुक्यातील सर्वोत्कृष्ट शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. सर्वोत्कृष्ट ठरलेल्या शाळांना प्रोत्साहन अनुदान म्हणून दोन लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमादेखील करण्यात आले आहेत.

         वारदोली शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा सूर्यवंशी आणि उपशिक्षिका ज्योती किसन भोपी या केंद्रप्रमुख गीता रवींद्र तिगडे व जयश्री मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवनवीन उपक्रम राबवित असतात. अत्यंत सुंदर रंगरंगोटी केलेली ही शाळा प्रथमदर्शनी पाहणाऱ्याला भान हरपायला लावते.स्वच्छ आवार, फुलांनी लगडलेली छोटेखानी बाग,बोलक्या भिंती,आवश्यक सोयी सुविधा यामुळे ज्ञान ग्रहण करण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण शाळेत पाहायला मिळते. याच्या जोडीलाच कब बुलबुल युनिट, स्पर्धा परीक्षांची तयारी, अत्याधुनिक प्रणालीचा अवलंब करत हसत खेळत शिक्षण देखील या शाळेत मिळते. सणवार,राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या, राष्ट्रीय सण हे सारे उत्साहाच्या वातावरणात या शाळेत साजरे केले जातात. विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक या दोघांचाही सहभाग मिळवण्यासाठी शिक्षकवृंद परिश्रम घेत असतो.

        शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र धर्मा बताले, उपाध्यक्ष गुरुनाथ शेळके तसेच सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचे देखील शाळेच्या उपक्रमांना सातत्याने योगदान लाभत असते.रा जी प शाळा वारदोली यांना तालुक्यातील सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे मुख्याध्यापिका अरुणा सूर्यवंशी आणि उपशिक्षिका ज्योती किसन भोपी यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. दुग्ध शर्करा योग म्हणजे याच शाळेतील उपशिक्षिका ज्योती किसन भोपी यांना आदर्श शिक्षिका हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे एकाच शाळेस आदर्श शिक्षिका आणि तालुक्यातील सर्वोत्कृष्ट शाळा असे दोन बहुमान मिळाल्याने शाळेच्या शिरपेचात दुहेरी तुरा खोवला गेल्याची भावना येथील ग्रामस्थांच्यात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.