ज्या शाळेने शिकविले त्या शाळेचे ऋण फेडणे या जन्मात शक्य नाही
– समिर आंबवणे
रसायनी/ प्रतिनिधी.
ज्या शिक्षण संस्थेमध्ये आपण शिक्षण घेतो त्या शैक्षणिक संस्थांसोबत आपले तहहयात एक नाते निर्माण होते. आशा संस्थांच्या उत्कर्षासाठी झटणे ही आपणा सगळ्यांची सामाजिक बांधिलकी असली पाहिजे. ज्या शाळेने आपल्याला घडवले, शिकवले त्या शाळेचे ऋण फेडणे या जन्मात तरी शक्य नाही असे उद्गार पुरस्कार प्राप्त शिक्षक समीर अंबावणे यांनी काढले.गुळसुंदे हायस्कूल १९९२ सालच्या एस एस सी पास आऊट बॅच चे वतीने आयोजित विविध सामाजिक उपक्रमांचे वेळी सूत्रसंचालन करताना त्यांनी उपरोक्त भूमिका मांडली.
गुळसुंदे हायस्कूल येथील १९९२ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांनी नुकतीच शाळेला ३२ वर्षानंतर भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकरता स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ५००० लिटर क्षमता असणारी पाण्याची टाकी बसवून दिली. तसेच ऊन व वारा यापासून टाकीचे संरक्षण व्हावे म्हणून त्याकरता शेड देखील बसवुन दिलेली आहे. महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित महिलांच्या हस्ते पिण्याच्या पाण्याचे नियोजन शाळेला हस्तांतरित करण्यात आले. निसर्ग संवर्धनाची गरज लक्षात घेऊन या बॅचने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करत आगामी पिढीला एक आदर्श पायंडा घालून दिला.
या छोटेखानी परंतु आपुलकीच्या समारंभाचे सूत्रसंचालन रसायनी येथील प्रथितयश ट्युटोरियल तज्ञ समीर आंबवणे यांनी केले.यावेळी दिनेश पवार,वसंत पाटील, संजय गोंधळी, ऊमेश ठोकळ, रमेश राऊत, दिलीप गायकवाड, जगदीश गोडीवले, मानसी जोशी, चित्रा तांबोळी, ललिता शिगवण, माई पाटील, ऊज्वला चव्हाण तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री बखर सर उपस्थित होते.
Be First to Comment