पनवेल/ प्रतिनिधी.
पनवेल तालुक्यातील वारदोली जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी बोलीभाषेत सहज रुळलेल्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शिकत अनोख्या पद्धतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला.उपशिक्षिका ज्योती भोपी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभिनव शिक्षण पद्धतीमुळे मुलांच्यात मराठी बोलताना एक अनोखा आत्मविश्वास दिसून आला.शाळेतील मुलांनी दिवसभर विविध उपक्रमांतून मराठी भाषेची महती, गोडवा आणि गंमत अनुभवली.
२७ फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रंथ दिंडी काढत कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.त्यानंतर दिप प्रज्वलन करत सगळ्यांनी मराठी भाषा समृद्ध करण्याची शपथ घेतली.त्यानंतर बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले.यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी गाणी,गोष्टी,कविता, समुहगीत,भजन, जात्यावरील ओव्या सादर करत मराठी भाषेचा जागर केला. तत्पूर्वी उपशिक्षिका ज्योती भोपी यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व सगळ्या मुलांना समजावून सांगितले.
त्या कार्यक्रमाचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षिका ज्योती भोपी यांची अभिनव संकल्पना. रोजच्या बोली भाषेमध्ये अनाहूतपणे आपल्या तोंडात काही इंग्रजी शब्द कायमचे विराजमान झालेले असतात. थँक्यू, इट्स ओके, व्हेरी गुड,ओ नो,बस स्टँड,रेल्वे स्टेशन यासारखे अनेक इंग्रजी शब्द अजाणतेपणे आपण बोलून जातो. त्यामुळे ज्योती भोपी यांनी मुलांचे दोन गट केले. पहिल्या गटात अनाहूतपणे बोलल्या गेलेल्या इंग्रजी शब्दासह उच्चारण केले जायचे. तर दुसऱ्या गटात त्याच इंग्रजी शब्दाला पर्यायी मराठी शब्द शोधून तेच वाक्य पुन्हा बोलले जायचे. या अनोख्या प्रयोगाचा आनंद विद्यार्थ्यांनी मनमुराद लुटला. ज्योती भोपी यांच्या या अनोख्या संकल्पनेमुळे त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे.
Be First to Comment