Press "Enter" to skip to content

मित्र मेळ्याला लाभला गुरुजनांचा आशिर्वाद

२४ वर्षांनी कॉलेज बाकांवर बसून भावनाविवष झाले १९९७ बीएससी पदवीधर

पनवेल/ प्रतिनिधी.

रसायनी विभागातील पुरस्कारप्राप्त,प्रथितयश ट्युटोरियल मास्टर समिर आंबवणे आणि नॅशनल रायफल शूटर किसन खारके यांच्यासह त्यांच्या बॅचमेट्सनी मागच्या वर्षी तब्बल २३ वर्षानंतर,१९९७ साली रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेजमधून पास आऊट झालेल्या मित्रांना एकत्र करण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले होते. मागच्या वर्षीपासून एकत्र जमलेली ही मित्रमंडळी प्रत्येक वर्षी भेटायचेच या ईर्षेने पेटून उठत २०२४ च्या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा मित्र मेळ्याच्या निमित्ताने जमली होती. यंदाचे वर्षी नुसत्याच गाठीभेटीवर भर न देता, ज्या महाविद्यालयाने आपल्याला पदवी दिली आणि ज्यामुळे आपल्याला उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त झाले, समाजात ओळख प्राप्त झाली! त्याच महाविद्यालयात जाऊन पुन्हा एकदा २४ वर्षांपूर्वीचा कालखंड जागवावा या उदात्त हेतून या गेट-टुगेदर चा प्रारंभ करण्यात आला.
          १९९७ चे परीक्षेत पदवी प्राप्त झालेले आणि आता पन्नाशीकडे वेगाने झुकू लागलेले सारे विद्यार्थी रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी ए एस सी कॉलेजच्या प्रांगणात जमले. यंदाच्या वर्षीच्या मित्र मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे तमाम विद्यार्थ्यांच्या भेटीच्या ओढीने कॉलेजचे प्राचार्य गणेश ठाकूर सर आवर्जून सुट्टीच्या दिवशी देखील हजर राहिले. तब्बल पाव शतकानंतर भेटणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहून गणेश ठाकूर सर आणि विद्यार्थी या दोघांच्याही डोळ्यात अभिमानाची, अभिनंदनाची आणि आपुलकीची झलक ओतप्रोत झळकत होती.गणेश ठाकूर सर यांचा १९९७ पास आऊट्स बॅच च्या वतीने पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाविद्यालयीन कालखंडाची अनुभूती घेण्याकरता सर्व विद्यार्थी वर्गात जाऊन बाकांवरती बसले. तब्बल २४ वर्षांपूर्वीच्या अनुभवांची, गमतीची, संघर्षाची,परिश्रमाची आणि त्यानंतर प्राप्त केलेल्या यशाची सर्वच विद्यार्थी एकमेकांसोबत देवाणघेवाण करत होते. आज ज्यांची अपत्य कॉलेजमध्ये शिकत आहेत ते कॉलेजमध्ये आलेले विद्यार्थी पुन्हा एकदा त्या कुमारावस्थेत गेलेले पाहून गणेश ठाकूर सर त्या सगळ्यांची गाठभेट एन्जॉय करत होते. कुठलीही तयारी न करता गणेश ठाकूर सर आणि १९९७ पास आऊट्स विद्यार्थी यांनी मनातलं मनापासून व्यक्त होत एकमेकांशी मोकळा ढाकळा संवाद साधला.
            वास्तविक १९९७ पास आऊट बॅच कॉलेजमध्ये शिकत असताना गणेश ठाकूर सर ऑरगॅनिक केमिस्ट्री शिकवत असत. त्यांच्या समवेत सगळ्यांनीच त्या काळच्या तमाम शिक्षकांचे प्रति ऋणनिर्देश व्यक्त केले. दुग्धशर्करा योग म्हणजे तेच गणेश ठाकूर सर आज कॉलेजचे प्राचार्य आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी सुद्धा ते विराजमान झालेले होते. रयत शिक्षण संस्थेतील अनेक संविधानिक पदे उपभोगल्यानंतर देखील गणेश ठाकूर सरांनी कुठलीही फॉर्मॅलिटी न पाळता त्यांच्या विद्यार्थ्यांसमवेत कॅन्टीन मध्ये बसून मस्तपैकी वडापावच्या न्याहारीचा आस्वाद घेतला. कॉलेजमधील समारंभ संपल्यानंतर तमाम मित्रांच्या गाड्या नानोशी येथील किसन खारके आणि त्यांच्या टीमने निवड केलेल्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या शिव आरूष फार्म हाऊस कडे वळल्या.
           शिव आरूष फार्म हाऊस येथे आल्यावर निसर्गाच्या कुशीत आल्याचा फिल सगळ्यांनी व्यक्त केला. विस्तीर्ण आवार, मळ्यामध्ये लगडलेली भाजी, नाविन्यपूर्ण वास्तुशास्त्राचा अवलंब करत बांधलेली टुमदार वास्तू आणि या सगळ्याच्या जोडीला प्रशस्त स्विमिंग पूल! मित्रमेळा मध्ये आता खऱ्या अर्थाने रंगत भरू लागली. गप्पांचे फड जमले, स्विमिंग पूल मध्ये आज “बाप” झालेले सगळे विद्यार्थी अक्षरशः मुलं होऊन डुंबु लागले. गाजलेल्या संगीताच्या तालावर तमाम बॅच थिरकत आणि फिरकत होती.
            किसन,समीर यांच्या टीमने मासळी बाजारातून निवडून आणलेल्या आणि चोखंदळ मत्स्यहारी व्यक्तींनी निवड केलेल्या फिश रेसिपीज तयार असल्याचा एक मेसेज त्यांचा दरवळ घेऊन आला. चार मित्र भेटल्यावरती हिंडकळणारे प्याले जरा जोरातच एकमेकांवर आपटत “चिअर्स” म्हणत होते.त्यामुळे जुन्या आठवणींना जोरदार उमाळा आला होता.पोटातली भूक जशी जाणीव करायला लागली तसे सगळे बॅचमेंट्स एकत्रितपणे जमून सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊ लागले. अभक्षभक्षण न करणाऱ्या मित्रांसाठी शाकाहारी जेवणाची देखील उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
          निवांत क्षणी सारे मित्र आपापली सुख आणि दुःख एकमेकांसोबत शेअर करत होते. एखाद्याच्या नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा देत त्यात आवर्जून सहभागी होण्याची आश्वासने देत होते. कुणा मित्राच्या संघर्षामध्ये धावून जाण्यासाठी कटीबद्ध असण्याचा शब्द सुद्धा देत होते. मित्र मेळ्यात सहभागी न होणाऱ्या मित्रांना फोन करून, व्हिडिओ कॉल करून पुढच्या वर्षी नक्की या रे!!!  यासाठी सारी जमवाजमवी होत होती. काही मित्र तर पूर्वनियोजित कार्यक्रम उरकल्यानंतर फक्त आणि फक्त मित्रांची भेट घेण्याकरता देखील फार्म हाऊस वरती प्रकट झाले. अपेक्षा नसताना असे अचानक प्रकट झालेल्या मित्रांना पाहून तर मैत्रीचा आयाम गगनाला भिडला. गच्च मिठ्या, टांग खेचणे,जुन्या गुलाबी आठवणी,किस्से,गोड भानगडी !! हे सारे अनुभवण्यात दिवस कसा सरला तेच कुणाला कळले नाही.पुन्हा पुढच्या वर्षी याच उमेदीने, याच उत्साहाने भेटायचे या वचनाची देवाण-घेवाण झाल्यानंतर सगळेजण आपापल्या घराकडे मार्गस्थ झाले.
          खरे म्हणजे गेट टुगेदर या संकल्पनेचा खरा अर्थ ही सारी मंडळी जगली. आपण त्या क्षणाचा आनंद घेत असताना जे अनुपस्थित आहेत त्यांनी देखील तो घ्यावा यासाठी यातला प्रत्येक जण झटत होता. आपण ज्या महाविद्यालयात शिकलो किंबहुना ज्या महाविद्यालयाने आपल्याला पदवी दिली,ओळख दिली त्या महाविद्यालयाला आपण देखील काहीतरी दिले पाहिजे असा उदात्त विचार जागवत १९९७ बॅच कायम कार्यरत राहणार आहे यात जराही दुमत नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.