प्रमोदिनी देशमुख यांच्या ओघवत्या शैलीतील सादरीकरणाने पनवेलकर झाले मंत्रमुग्ध
पनवेल/ प्रतिनिधी. दिनांक २८ फेब्रुवारी.
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कविता जागवायच्या असतात, जोजवायच्या असतात आणि त्या जगायच्या असतात असे विचार मांडत ज्येष्ठ साहित्यिका, कवयित्री प्रमोदीनी देशमुख यांनी रसिकहो प्रस्तुती संस्थेने आयोजित,आणिक स्मृती ठेवून जाती ! या कार्यक्रमात पनवेलकरांना एक आगळा वेगळा काव्यानुभव दिला. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी पनवेलच्या सीकेपी हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मंगेश पाडगावकर यांच्या समवेत साहित्य साधना करणाऱ्या प्रमोदिनी देशमुख यांनी पाडगावकरांच्या काव्य बांधण्याच्या विविध शैली सहजगत्या उलगडून दाखवत रसिक प्रेक्षकांना तरल कवितांच्या भावविश्वात अलवारपणे नेले. पाडगावकरांचे अनेक गमतीशीर किस्से,सखोल विचार,वैचारिक बैठक,कवितेचे बीजारोपण अशी चौसोपी मांडणी करत प्रमोदिनीताईंनी कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला.रसिकहो प्रस्तुती च्या आगळ्या वेगळ्या अशा कार्यक्रम नियोजनाचे साहित्य विश्वात कौतुक होत आहे.
पनवेल मधील कवी प्रेमींनी एकत्र येत रसिकहो प्रस्तुती या संस्थेची स्थापना केली आहे.मंगळवारी सायंकाळी पनवेलचे रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रम स्थळी प्रमोदिनी देशमुख यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. मंदार दोंदे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रम आयोजित करण्यामागची भुमिका विशद केली तसेच प्रमोदिनी देशमुख यांच्या कार्याची ओळख रसिक प्रेक्षकांना करून दिली. त्यानंतर आशिष चौबळ यांनी कविवर्य मंगेश पाडगावकर यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारांचे बाबत प्रेक्षकांना अवगत केले तसेच पाडगावकरांच्या जीवनप्रवासाचे वर्णन अत्यंत मार्मिक शब्दात केले. प्रमोदिनी देशमुख यांनी निवड केलेल्या पाडगावकरांच्या १८ कविता आणि त्यांच्या कवितांचे गाणे झालेली सहा गाणी प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली. रसिकहो प्रस्तुतीच्या आशिष चौबळ,योगेश राजे, मंदार दोंदे, संपदा देशपांडे, सानिका पत्की, स्मिता सबनीस, गौरी राजे यांनी पाडगावकरांच्या शब्दरचनेला योग्य न्याय देत अत्यंत सुंदरपणे कवितांचे सादरीकरण केले.बोरिवलीचे प्रदीप फणसे आणि पनवेलची सिद्धी म्हात्रे यांनी अत्यंत सुरेल आवाजात गाणी सादर केली.
भाषा जगवण्यासाठी त्या भाषेतील साहित्यरत्न टीकवली पाहिजेत,नव्याने साहित्य फुले निर्माण केली पाहिजेत या उदात्त हेतूने रसिकहो प्रस्तुती ही संस्था प्रथितयश तसेच नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी झटत असते.याच प्रयत्नातून संस्थेने नानाविध कार्यक्रमांतून कवी मंडळींसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कार्यक्रमाच्या अंतिम चरणात सानिका पत्की यांनी ज्या ज्या ज्ञात अज्ञात हातांनी यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले त्यांच्याप्रति ऋणनिर्देश सादर केले.त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Be First to Comment