Press "Enter" to skip to content

नवी मुंबई महानगर पालिकेचा बहुप्रतिक्षित विकास आराखडा अखेर प्रकाशित

बेलापूर / प्रतिनिधी.


अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर  नवी मुंबई महानगरपालिकेने  (एन.एम.एम.सी.) आपला पहिला विकास आराखडा २३ फेब्रुवारी  २०२४ रोजी प्रकाशित केला. पालिकेच्या स्थापनेपासून ३३ वर्षात प्रथमच पुढील दोन – तीन दशकातील शहराच्या विकासाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. भारतातील सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक म्हणून नवी मुंबईचे महत्त्व हे काही लपलेले नाही. शहराच्या पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि सार्वजनिक सेवांचे व्यवस्थापन आणि विकास करण्याची जबाबदारी असलेली एन.एम.एम.सी. अनेक वर्षांपासून या विकास आराखड्यावर काम करत आहे. अनेकजण त्याच्या प्रकाशनाची आतुरतेने वाट पाहत होते. विविध समस्या आणि आव्हानांमुळे प्रकाशनास विलंब झालेला विकास आराखडा, भविष्यातील शहराची वाढ आणि विस्तारासाठी तयार करताना शहराच्या सर्वात गंभीर समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाने केलेला आहे. सदर विकास आराखड्याच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये वाहतूक सुधारणे, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे, परवडणाऱ्या घरांचे अधिक पर्याय निर्माण करणे आणि शहरातील रहिवाशांचे जीवनमान उंचावणे यांचा समावेश आहे.
विकास आराखड्याचा मसुदा  सन २०१६ च्या शेवटी प्रकाशित करण्यात आला होता. पुढे, कोविड महामारी आणि इतर काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे हि प्रक्रिया रखडली होती. तथापि, सदर विकास आराखडा एमआरटीपी  ऍक्ट १९६६ चे कलम २६ (१) अंतर्गत २०२२ मध्ये अनेक अडथळे पार करून प्रकाशित करण्यात आला, आणि त्यानंतर सामान्य जनता आणि संस्थांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या. शहरातील विविध व्यक्ती व संस्थांकडून शेकडो सूचना व हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. या सर्व सूचना आणि हरकती नगररचना संचालकांनी एमआरटीपी कायदा १९६६  चे  कलम २८(२) अंतर्गत स्थापन केलेल्या नियोजन समितीने विहित कालावधीत सखोलपणे ऐकून घेतल्या. नियोजन समितीने आपला सविस्तर अहवाल १६ फेब्रुवारी २०२४ रोजी नियोजन प्राधिकरणास सादर केला. आणि, समितीच्या शिफारशी विचारात घेऊन आणि प्रस्तावित विकास आराखड्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा, बदल आणि दुरुस्त्या अंमलात आणून एमआरटीपी कायदा १९६६ चे कलम २८(४) नुसार फेरबदलासह महानगरपालिकेने प्रकाशित केला. आणि, एमआरटीपी कायदा १९६६ चे कलम ३० अन्वये अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सदर केला आहे.
सदर विकास आराखड्यातील प्रमुख वैशिष्ट्ये  म्हणजे आधुनिक व रुंद रस्ते, पादचाऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा, पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे, नवीन सार्वजनिक जागा आणि मनोरंजन क्षेत्रांचा विकास, पाळीव प्राण्यांचे अंत्यसंस्कार करणेकरीता नेरुळ नोडमध्ये आरक्षित जागा, क्रीडा संकुलांसाठी वाढीव चटईक्षेत्र यांचा समावेश आहे. विशेषत: महानगर पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या बोरिवली, आडिवली आणि भुतावली या गावांमध्ये असमान आणि डोंगरी क्षेत्राच्या जमिनीवर तपशीलवार नियोजन करण्यावरही लक्षणीय भर दिला आहे, ज्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून नियोजन विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते.  शाश्वत सामाजिक विकास आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक उपक्रम तयार करणे, जसे की हरित ऊर्जेला चालना देणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे, उद्यानांचे आरक्षण, मुलांसाठी खेळाची मैदाने, सामुदायिक वापराच्या जागा ही या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
महानगरपालिकेचे अतिरिक्त संचालक नगररचना यांच्या निवेदनात श्री. सोमनाथ केकाण ते म्हणाले हि, “हा विकास आराखडा शहराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी सर्वसमावेशक रोडमॅप आहे, ज्यामध्ये सर्व प्रमुख क्षेत्रे आणि लक्ष्य केंद्रीत केले गेले आहे. आम्हाला विश्वास आहे की नवी मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर बनेल आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करेल.”
शहरातील जुन्या इमारती आणि गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी, या आराखड्यात मूळत: कमी रुंदी असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे, जेणेकरून पूर्णार्विकासातील अडथळे दूर होऊन त्यास गती मिळेल. शिवाय, शासनाच्या निर्देशांचा विचार करून आणि प्रारुप आराखड्यात सुरुवातीला आरक्षित असलेल्या सिडकोने लिलाव केलेल्या भूखंडांचा प्रश्न संपवण्यासाठी, पालिकेने सिडकोने लिलाव केलेल्या भूखंडांच्या प्रकरणांमध्ये अशी आरक्षणे हटवण्याचा निर्णय घेतला. तथापि, नवी मुंबईतील नागरिकांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन इतर जमिनींवरील उर्वरित इतर सर्व आरक्षणे यशस्वीपणे सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.
विविध स्तरातील लोकांनी या विकास आराखड्यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, काहींनी शाश्वत विकास आणि सामाजिक कल्याणावर लक्ष केंद्रित केल्याची प्रशंसा केली आहे, तर काहींनी काही प्रस्तावांच्या व्यवहार्यता आणि अंमलबजावणीबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. “हा एक ठोस आणि विचारपूर्वक आखलेला विकास आराखडा आहे जो आमच्या शहरातील अनेक प्रश्न व अडचणींचे निराकरण करेल” असे एका सामाजिक कार्यकर्त्याने म्हटले आहे. “तथापि, महानगरपालिका आणि नागरिक यांनी एकत्र येऊन काम करावे लागेल, जेणेकरून  सदर आराखड्यासातील प्रमुख उद्दिष्टे कार्यक्षमतेने आणि पारदर्शकपणे अमलात आणता येतील ” असे पालिका अधिकाऱ्यांनी बोलताना स्पष्ट केले.
एकूणच, हा विकास आराखडा नवी मुंबई आणि येथील रहिवाशांसाठी आशादायक भविष्याचा संकेत आहे. मार्गात आव्हाने आणि अडथळे असू शकतात, तरीही अधिक राहण्यायोग्य आणि शाश्वत शहर निर्माण करण्याची महानगरपालिकेची वचनबद्धता या दिशेने टाकलेले पाऊल आहे. येत्या काही वर्षांत हा विकास आराखडा कसा अमलात येतो हे पाहणे बाकी आहे, परंतु सध्या तरी नवी मुंबईच्या विकासाची आणि गरुडभरारीची शक्यता उज्ज्वल आहेत.
*****

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.