Press "Enter" to skip to content

शानदार हळदी कुंकू सोहळ्याला मराठी सिने तारकांची झळाळी

हळदी कुंकू समारंभाला उर्मिला कोठारे व गायत्री दातार यांची उपस्थिती

पनवेल / प्रतिनिधी

शेतकरी कामगार पक्ष आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या आयोजनाखाली हळदी कुंकू समारंभाचे आयोजन पनवेल मधील व्ही के हायस्कूलच्या पटांगणावर १० फेब्रुवारी २०२४ रोजी शनिवारी संध्याकाळी वाजता करण्यात आले होते. या हळदीकुंकू समारंभाला सिने अभिनेत्री उर्मिला कोठारे व गायत्री दातार यांची उपस्थिती लाभली. यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी गर्दी केली होती. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदी कुंकू साजरे करण्याला महत्त्व आहे. हा एक सामाजिक कार्यक्रम आहे जो समाजातील बांधिलकी वाढवतो. हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण सुवासिनींना आमंत्रित करतो. या सुवासिनी साक्षात आदिशक्तीचे स्वरूप म्हणून येतात आणि आपण जेव्हा त्यांना हळदी कुंकू लावतो तेव्हा साक्षात आदिशक्तीचे रूप हे जागृत होते. त्यामुळे आपण अप्रत्यक्षरीत्या देवीची म्हणजेच आदिशक्तीची पूजा करतो. हळदी-कुंकूवा बरोबरच सुवासिनींना वाण म्हणून एक भेटवस्तू देखील दिली जाते. जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने हीच संस्कृती जपताना दिसत आहे. आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या मैत्रिणींना थोडा विरंगुळा मिळवून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, सोबतच हसत खेळत भरघोस बक्षिसे लुटावी आणि खऱ्या अर्थी त्यांची ओळख आनंदाच्या ह्या हळदी कुंकू कार्यक्रमात निर्माण व्हावी यासाठी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री उर्मिला कोठारे व गायत्री दातार आल्या होत्या. यावेळी हळदीकुंकू सोहळा साजरा करत असताना विविध खेळ घेऊन हास्यजत्रा फेम अभिनेते जयवंत भालेकर यांनी या समारंभात रंगत आणली. उर्मिला कोठारे आणि गायत्री दातार यांनी या उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले अशा प्रकारे महिला एकत्र येत असतील तर हळदीकुंकू समारंभ व्हायलाच हवेत आणि हा कार्यक्रम घेतल्याबद्दल जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे विशेष आभार मानले. यावेळी हळदी-कुंकू समारंभाचे महत्त्व सांगून महिलांनी अशा कार्यक्रमात सहभाग घेऊन आपली संस्कृती जपावी असे सौ. ममता प्रितम म्हात्रे यांनी सांगितले. त्यानंतर उपस्थित महिलांना हळदी-कुंकू, वाण देऊन हळदीकुंकू साजरा करण्यात आला . यावेळेस हजारो महिलानी उपस्थिती दर्शविली. मोठया उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात हळदी-कुंकू समारंभ सोहळा संपन्न झाला. या समारंभात शेकाप महिला आघाडी सोबतच पनवेल शहर ,उरण आणि खालापूर परिसरातील बचत गट तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.