सकल हिंदू समाजाच्या वतीने अयोध्यामध्ये जाऊन कारसेवा देणाऱ्यांचा सन्मान.
पनवेल/ प्रतिनिधी.
तब्बल साडेपाचशे वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मस्थळी त्यांचे भव्य दिव्य मंदिर साकारण्याचे स्वप्न साकार होत आहे. हिंदुत्व विरोधी संघटनांनी जंग जंग पछाडत मंदिर निर्माणाला विरोध केला होता.त्याचाच परिपाक म्हणून श्री राम लल्लांच्या मूर्तीला तब्बल ३४ वर्षे तंबू मध्ये वास्तव्य करावे लागले. पराकोटीच्या संघर्षाला आता यशाची रसाळ गोमटी फळे आलेली आहेत.२२ जानेवारी रोजी अयोध्येत श्री मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. ज्या कार सेवकांच्या रक्तावर, परिश्रमावर, संघर्षावर ही विजयी पताका डोलत आहे त्यांचे ऋण या जन्मात फेडणे तरी शक्य नाही.पण त्यांच्या अनन्य साधारण धाडसाचे कौतुक म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने पनवेल तालुक्यातील कारसेवकांचा सन्मान गुरुवार दिनांक १८ जानेवारी रोजी सायंकाळी पनवेलच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील जवळ पास १०५ कार सेवकांनी १९९३ साली अयोध्या येथे जाऊन राम मंदिर निर्माण साठी संघर्ष केला होता. त्यातील ६० कारसेवकांचा आयोजकांच्या वतीने सन्मानचिन्ह शाल आणि श्री राम मंदिराची प्रतिकृती देऊन सन्मान करण्यात आला. यातील ८ कारसेवकांचे त्यानंतरच्या काळात निधन झालेले असल्यामुळे त्यांच्या परिवाराचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख वक्ते नंदकुमार मराठे यांनी ओघवत्या शैलीमध्ये आपले विचार मांडले. आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. सन्मान सोहळ्यापूर्वी पनवेल एसटी स्थानकासमोरील विसावा हॉटेलपासून मिरवणूक काढण्यात आली. सुप्रसिद्ध गायक मुकेश उपाध्ये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले, शरद म्हसकर यांनी आयोध्या संघर्ष गीत सादर केले. तर नितीन केळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या सन्मान सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब पाटील, भाजपाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.मनोज भुजबळ, भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील,दादा जोशी,माजी नगरसेविका दर्शना भोईर आदी मान्यवरांच्या सह तालुक्यातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे तमाम कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत पदाधिकारी परेश मुरबाडकर, निलेश पाटील आणि हेमंत अधिकारी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले.



Be First to Comment