Press "Enter" to skip to content

नोकरभरती प्रकरणी लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या इसमाविरोधात पोलीसांत तक्रार

पनवेल (प्रतिनिधी )

पनवेल महानगरपालिकेत होत असलेल्या नोकर भरतीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश रामशेठ ठाकूर यांच्या नावाचा गैरवापर आणि जनतेची फसवणूक एक इसम करीत असल्याचे उघडकीस आले. या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. 

         पनवेल महानगरपालिकेची नोकरभरती रितसर ऑनलाईन अर्ज आणि केंद्रावर लेखी परिक्षा घेऊन होत आहे. असे असतानाही उमेदवारांना अमिष दाखवण्याचा प्रकार करण्यात येत असल्याचे ध्यानी आले.  हा प्रकार करणाऱ्या सदर इसमाच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात लेखी निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या आकृतिबंधात मंजूर केलेल्‍या ४१ संवर्गातील ३७७ विविध पदांसाठी नुकतीच भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल झाल्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा राज्यातील विविध केंद्रावर पारदर्शकपणे सर्व दक्षता घेऊन डिसेंबर २०२३ या कालावधीत पार पडली.  सर्व प्रक्रिया रितसर आणि पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचे जाहीर करतानाच दरम्यानच्या काळात या सर्व प्रकियेत फसवणुकीचा प्रकार घडण्याची शक्यता आयुक्त गणेश देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमातून अधोरेखित केली होती. त्या अनुषंगाने तशी काळजीही या प्रक्रियेत घेण्यात आली. मात्र लेखी परिक्षेच्या वेळी पवई येथील केंद्रावर एका इसमाने पैसे घेऊन पनवेल महापालिकेत नोकरी लावण्याचे अमिष काही उमेदवारांना दाखवले. तसेच माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचेही नाव घेतले.  परेश ठाकूर यांची बदनामी आणि उमेदवारांची फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा त्या इसमाने केला आहे. त्या बाबींची गंभीरपणे दखल घेऊन नाहक बदनामी, नोकर भरतीत गैरप्रकार आणि उमेदवारांची फसवणूक करणाऱ्या इसमाविरोधात पोलीस ठाण्यात लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.