Press "Enter" to skip to content

पंतप्रधनपदासाठी मोदी साहेबांच्या हॅट्ट्रिक मध्ये मुसलमान बांधवांच्या मतांचा सिंहाचा वाटा असेल…. इद्रिस मुलतानी यांचे प्रतिपादन

पनवेल येथे भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या कोकण विभागीय संयोजकांची आढावा बैठक संपन्न


पनवेल / वार्ताहर
आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाचा दृढ संकल्प भारतीय जनता पक्षाने केलेला आहे.याच विजय संकल्पाच्या अनुषंगाने २८ डिसेंबर रोजी पनवेलच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागातील लोकसभा मतदारसंघांच्या संयोजकांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीनंतर इद्रिस मुलतानी यांनी उपरोक्त उद्गार काढले.
भाजपा उत्तर रायगड चे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थित संयोजकांना संबोधित करताना इद्रिस मुलतानी म्हणाले की अल्पसंख्यांक समाजातील अन्य धर्मीय भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी असले तरी देखील मुस्लिम समाज अजून म्हणावा तसा मते देत नाही. याचाच परिपाक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सकारात्मक आणि लोकाभिमुख राजकारणातील लोकप्रतिनिधींच्या संख्येत मुस्लिम समाजाचे लोकप्रतिनिधी फारशा संख्येने आढळून येत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी ज्या मुस्लिम बहुल बुथवर भारतीय जनता पार्टीला मतदान होत नाही असे बूथ अधोरेखित करून तिथे संशोधन करण्याची आवश्यकता आहे.
ते पुढे म्हणाले की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मुस्लिम समाजाकरता आखलेल्या योजनांची या बूथ मधील शेवटच्या व्यक्तीपर्यंत माहिती करून द्यावी लागेल. या योजनांच्या निकषांमध्ये जास्तीत जास्त लाभार्थी बसवून आम्हीसुद्धा जात, धर्म, पंथ न पाळता लोकाभिमुख राजकारण करणाऱ्या भाजपची छबी जनमानसात घेऊन जावे लागेल.२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हॅट्रिक करणार आहेत. त्यांच्या विजयामध्ये मुस्लिम समाजाची विशेषत्वाने जाणवतील अशी लाक्षणिक मते आपल्याला मिळवून द्यायची आहेत.म्हणूनच मुसलमान बांधवांची मते मिळावीत या उद्देशाने आपल्याला सकारात्मक राजकारण करावे लागेल.यासाठी इद्रिस भाई यांनी ब्ल्यू प्रिंट तयार केलेली असून तब्बल तीन तासांहून अधिक काळ

संयोजकांसोबत चर्चा करत त्यांनी स्ट्रॅटेजी यशस्वी बनविण्याचे नियोजन केले.मोदी साहेबांनी मुस्लिम समाजातील बांधवांना “एका हाती कुराण तर दुसऱ्या हाती कॉम्प्युटर” हा विकासाचा मंत्र दिला असून तो घराघरात पोहोचवण्यासाठी आपण सारे कंबर कसुयात असे देखील ते म्हणाले.


अवघ्या पाच महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षस्थानी इद्रिस मुलतानी यांची नियुक्ती करण्यात आली होती. एखाद्या झंजावाताप्रमाणे काम करत मुलतानी यांनी राज्यभरात अपलासंख्यांक मोर्चाच्या सर्व कमिट्या, सर्व पदे या ठिकाणी सुयोग्य पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. आढावा बैठकीच्या निमित्ताने गेल्या पाच महिन्यात त्यांनी अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला आहे. औरंगाबाद येथील सिद्धेश्वर साखर कारखान्याचे ते विद्यमान चेअरमन असून सिल्लोड पंचायत समितीवर त्यांनी उपसभापती आणि सभापतीपदी नेत्रदीपक कामगिरी करून दाखविली आहे. मुस्लिम बहुल मतदार संघातून भारतीय जनता पार्टीला विक्रमी मतदान मिळवून देत मुलतानी यांनी राज्यभरात आपला नावलौकिक कमावला आहे.
पनवेल मध्ये झालेल्या आढावा बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मावळ लोकसभा मतदारसंघाचे संयोजक सय्यदभाई अकबर व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले.सय्यद अकबर यांच्या तगड्या नियोजनाची इद्रिस मुलतानी आणि अन्य संयोजकांनी प्रशंसा केली.पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांनी इद्रिस मुलतानी आणि उपस्थित संयोजक महोदयांचे स्वागत करून आढावा बैठकीसाठी शुभेच्छा दिल्या.
इद्रिस मुलतानी अध्यक्षस्थानी असलेल्या सदरच्या आढावा बैठकीसाठी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा मुंबईचे अध्यक्ष वसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष तथा हज कमिटीचे सरकार नियुक्त सदस्य सलीम बागवान,महामंत्री विरु सिंग,प्रदेश उपाध्यक्ष तथा मावळ लोकसभा मतदारसंघाचे संयोजक सय्यद अकबर,कोकण प्रदेश सहप्रमुख साबीर शेख, प्रदेश उपाध्यक्ष फत्तू सय्यद,भिवंडी लोकसभा संयोजक जमशेद खान, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे संयोजक बिलाल शेख,पालघरचे अल्ताब,अल्पसंख्यांक मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मन्सूर पटेल यांच्यासह संयोजक व पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने मुस्लिम समाजासाठी कार्यान्वित केलेल्या काही योजना..
पंतप्रधान शादी शगुन योजना – यामध्ये लाभार्थी तरुण मुलींना ५१ हजार रुपये प्रदान करण्यात येतात.
मुस्लिम समाजातील कारागिरांच्या उत्कर्षासाठी उस्ताद योजना.
मुस्लिम समाजातील गरीब तरुणांसाठी सिखो और कमाओ योजना.
मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी इदी योजना, यामध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.आत्तापर्यंत पाच करोड मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे.
मधूनच शाळा सोडून दिलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख कौशल्य विकास देता यावा या उद्देशाने नई मंजिल योजना.
याशिवाय बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती अंतर्गत दोन करोड पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती दिली आहे.हज यात्रेसाठी “मरहम” बंद केले.
हज यात्रेतील कोटा दोन लाखांपर्यंत वाढवून दिला.
हज यात्रेमधील व्हीआयपी पॅटर्न बंद केले त्यामुळे सर्वसामान्य गरीब मुसलमान बांधवांना देखील आता हज यात्रा करता येते.
वक्फ बोर्ड कडील जमिनींवर मुसलमान समाजासाठी शाळा कॉलेज हॉस्पिटल उभारण्याची सुरुवात
हज यात्रेवरील जी एस टि १८ % वरून ५% इतका कमी केला.
मुसलमान बांधवांच्या उत्कर्षाकरता अर्थसंकल्पामध्ये २०१३ साली ३१६५ करोड रुपयांची तजवीज होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २०२२ मध्ये हिच तजवीज वाढवून ५०२१ कोटी रुपये इतकी वाढवली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.